Mulshi Dam: पाण्यावरुन वाद पेटला! मुळशी धरणातील एक थेंबही पुणे- पिंपरी चिंचवडला देणार नाही, कुणी दिला इशारा?
मुळशी धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. आमच्या तालुक्यात मुळशी धरण असताना आमची 564 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना मागील चार वर्षांपासून धुळ खात पडली आहे. फक्त पिण्याच्या पाण्याची परवानगी नसल्याने ही योजना रखडली आहे," असा आरोप अमित कंधारे यांनी केला आहे.

दीपक कापरे, प्रतिनिधी: मुळशी धरणाचं पाणी मुळशीकरांना मिळेपर्यंत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराला एक थेंब देखील पाणी आम्ही देऊ देणार नाही असा इशारा पुणे जिल्हा माजी नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पाण्यावरुन मुळशीकर विरुद्ध पुणे असा नवा वाद रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.
मुळशीच्या पाण्यावरुन वाद पेटणार!
“२२ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी धरणाचे पाणी पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहराला देण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा झाली सकारात्मक झाली. मात्र मुळशी धरणातील पाणी आमच्या हक्काचे आहे. आमच्या तालुक्यात मुळशी धरण असताना आमची 564 कोटींची पिण्याच्या पाण्याची योजना मागील चार वर्षांपासून धुळ खात पडली आहे. फक्त पिण्याच्या पाण्याची परवानगी नसल्याने ही योजना रखडली आहे,” असा आरोप अमित कंधारे यांनी केला आहे.
काय म्हणाले अमित कंधारे?
तसेच “महाराष्ट्र शासन शहरी भागाचा ग्रामीण भागापेक्षा जास्त विचार करते की काय? असा प्रश्न पडला आहे. आम्ही मुळशीच्या पाण्यासाठी वारंवार आंदोलने केली आहेत, रस्त्यावर उतरलो आहे. येणाऱ्या काळामध्ये मुळशीचे पाणी आम्हाला न देता या दोन शहरांना मिळणार असेल तर आम्ही त्या निर्णयाच्या विरोधात जाऊ. जोपर्यंत आम्हाला मुळशीकरांना आमचे हक्काचे पाणी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक थेंबही पुणे, पिंपरी चिंचवडला मिळू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुण्यात हजारो लिटर पाणी वाया!
दुसरीकडे, पुणे शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांवर पाणी कपातीचा भार टाकला जात असताना, दुसरीकडे महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा संतप्त सवाल शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उपस्थित केला आहे.