अमितजी ‘मातोश्री’पासून जरा जपून, अमित ठाकरेंना कोणी दिला सल्ला? वाढदिवशीच…
आज अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमितजींना मी खूप-खूप शुभेच्छा देतो, पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावं, असा सल्ला कदम यांनी अमित ठाकरे यांना दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कदम नेमकं काय म्हणाले?
कदम यांनी अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमिजींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पण त्यांनी ‘मातोश्री’पासून जरा सांभाळून राहावं, आज आदित्य तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले आहेत, भाऊ म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या, पण हा भाऊ किती दिवस टिकेल हे पहावं लागेल. आदित्य ठाकरे निवडून आले, पण तुम्हाला त्यांनी पाडलं, ‘मातोश्री’चं प्रचंड प्रेम आहे तुमच्यावरती असा खोचक टोला यावेळी कदम यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया
दरम्यान एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे याच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे, यावर देखील कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता चालवायची असेल तर दिल्लीला पैसे आणण्यासाठी जावं लागतं. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतात, उद्योजकांचेही काही प्रश्न असतात, त्यासाठी दिल्लीला जावं लागतं. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे, ते उत्कृष्ट काम करत आहेत, मराठी माणसाला ठेच लागेल असं कुठलंही काम त्यांच्याकडून होत नाही, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो, ‘एकनाथजी आप आगे बढो, हम सब आपके साथ है’ असं यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.