Amravati MLC Election Result 2026 : ‘शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिलं’, पराभव मनाला खूप लागला, भाजपच्या बंडखोर उमेदवाराचं स्टेट्स चर्चेत
Amravati MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. अनेकदा उमेदवारांना आपण लोकांसाठी भरपूर काही करतो म्हणून विजयाची अपेक्षा असते. पण असं होत नाही, तेव्हा हताशा येते. असंच भाजपच्या महिला बंडखोर उमेदवाराचं झालं आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांचा स्टेट्स चर्चेत आलं आहे. विधान परिषदेत निवडणुकीतील पराभव त्यांच्या जाम जिव्हारी लागला आहे. अमरावती शिक्षकची मतमोजणी सुरु असली तरी संगीता शिंदे यांच्या विजयाची अजिबात शक्यता नाहीय. संगीता शिंदे भाजपकडून तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. पण महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिवसेनेला सुटली. इथून शिवसेनेचे 19 व्या बाद फेरी अंती उमेदवार किरण सरनाईक 3660 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या दुसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
19 व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 9168 मतं मिळाली आहेत. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 5508 मतं मिळाली आहेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे 5202 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. संगीता शिंदे (बोंडे) यांना केवळ 2112 मिळाल्याने त्या नाराज आहेत. “आदरणीय गुरुजन धन्यवाद, आज खूप आनंद झाला, मला शिक्षकांनी माझी काय किंमत आहे हे दाखवून दिले” असं संगीता शिंदे यांनी स्टेट्सवर लिहिलय.
काल संगीता शिंदे काय म्हणालेल्या?
संगीता शिंदे या भाजपच्या खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. काल मतमोजणीआधी भाजपच्या बंडखोर उमेदवार सांगिता शिंदे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. “शिक्षण व्यवस्थेला लागलेली कीड नष्ट होणार या निवडणुकीत माझा विजय होईल” असं त्या म्हणालेल्या. “माझ्यावर देवाभाऊचाही आशीर्वाद होता. माझे भाऊ खासदार अनिल बोंडे यांचाही आशीर्वाद माझ्यासोबत होता, मी नक्की विजयी होईल” असं संगिता शिंदे म्हणालेल्या.
शिंदेंच्या उमेदवाराला विजयासाठी किती मतांची आवश्यकता?
अमरावती शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू शकलं नाही. म्हणून दुसऱ्या पसंती क्रमांकाची मतं मोजली जात आहेत. विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा आहे. कोटा कोण पूर्ण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 6966 मतांची आवश्यकता आहे.