ज्या कार्यालयात सनईचे सूर, तिथेच हलकल्लोळ.. लग्नानंतर अर्ध्या तासातच घडलं आक्रित, हार्ट अटॅकने..

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे एका लग्नसोहळ्यात हृदयद्रावक घटना घडली. विवाहविधी संपन्न झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासातच नवरदेव अमोल गोड यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. नववधूसह संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्या कार्यालयात सनईचे सूर, तिथेच हलकल्लोळ.. लग्नानंतर अर्ध्या तासातच घडलं आक्रित, हार्ट अटॅकने..
लग्नानंतर आक्रीत घडलं
| Updated on: Nov 26, 2025 | 11:06 AM

वाजत गाजत घरात आली, मंगलकार्यालयान सनई-चौघडे वाजले, आणि टाळ्यांच्या गजरात, अक्षतांच्या वर्षावत दोन जीव विवाहबद्ध झाले. पण त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांत अनर्थ घडला, एक झटका येऊन नवरदेव कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. घडलेल्या प्रकाराने गावकऱ्यांसह सर्वांनांच मोठा धक्का बसला, नववधूवर तर लग्नाच्या दिवशीच दु:खाचा डोंगर कोसळला. लग्नात आलेल्या या विघ्नाने सर्वच शोकाकुल झाले. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील वरुड तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

लग्नाची लगबग आणि अर्ध्या तासांत स्मशानशांतता

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. जिथे काही वेळापूर्वी लग्नाचे, आनंदाचे वातावरण होते, ज्या कार्यालयात सनईचे सूर होते, लोकांची बडबड, हसण्याचे आवाज,बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती, तिथे एका घटनेनेच स्मशान शांतता पसरली. . एका लग्नसोहळ्याचा शेवट अत्यंत हृदयद्रावक शोकांतिकेत झाला. लग्न लागल्यावर अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच अमोल गोड या वराला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा जीव गेला. त्यांच्या मृत्यूमुळे नववधू, तसेच कुटुंबिय शोकसागरात बुडाले.

हार्टअटॅक येऊन अनोल गोड हे खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले आणि एकच कल्लोळ माजला.

चक्कर येऊन मंडपातच कोसळले अन् सगळंच संपलं

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गोड हे अमरावतीच्या वरुड तालुक्यातील पुसला तलाठी कार्यालयामध्ये कोतवाल म्हणून काम करत होते. काल (25 नोव्हेंबर) त्यांच्या आयुष्यातील खास दिवस, कालच त्यांचा विवाह होता. मनात भविष्याचती संसाराची अनेक स्वप्न घेऊन ते लग्न कार्यालयात पोहोचले, थाटामाटात त्यांचं स्वागत झालं आणि वर-वधूने एकमेकांना हारही घातले. थोरामोठ्यांच्या साक्षीने त्यांचा विवाह पार पडला, आले पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला, तर काही जण हे वधू-वरांची भेट घेऊन शुभेच्छा देत होते.

कार्यालयात दोघे उभे होते तेव्हाच अघटित घडलं. लग्न लागल्यावर ते त्यांच्या नववधूसह उभे होते, मात्र अर्ध्या तासातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच धाडकन खाली कोसळले. ते पाहून सगळेच हादरले. नातेवाईंकांनी इतरांच्या मदतीने अमोल यांना उपचारांसाठी तातडीन नजीकच्या रुग्णालयात नेलं खर पण तोपर्यंतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आणि सर्वजण दु:खात बुडाले. अर्ध्या तासापूर्वूी ज्याच्याशी लग्न झालं, पती म्हणून ज्याच्यासोबत सप्तपदी घेतल्या, तोच संसाराची साथ अशी अर्ध्या तासातच सोडून गेल्याने त्यांच्या पत्नीवर दु:खाचा डोंगरच कोसळला. या दुर्दैवी घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.