
आमच्याकडे लाईट राहत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये बसून काय काम करता असा जाब विचारत अमरावतीमधील दोन संतप्त तरुणांनी भलतंच काही केलं. चार पेट्रोल भरलेल्या बाटल्या आणत त्यांनी कार्यालयातील टेबलवर त्या ओतल्या. खुर्चीवर पेट्रोल ओतले. टेबलवर माचिसची जळती काडी फेकत तो पेटवून दिला. अमरावतीच्या वलगाव महावितरण उपकेंद्रात पेट्रोल टाकून आग लावली. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही वीजेचा लपंडाव सुरू आहे. विद्युत खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे जनतेत रोष आहे. पण काही जण थेट कायदा हातात घेत असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.
पेट्रोल टाकून पेटवला टेबल
कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, गोपाल नेरकर, सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे हे रविवारी कार्यालयात होते. खारतळेगाव उपकेंद्रात दुपारी दोन तरुण त्या ठिकाणी आले. त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्यांनी हातात पेट्रोलची बाटली आणली. कार्यालय पेटवण्याची धमकी दिली. टेबलवर पेट्रोल ओतले आणि त्याला आग लावली. या घटनेचे व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी धमकावले. रविवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांच्या सुरक्षेची चर्चा होत आहे.
वलगाव पोलीसांनी केली कारवाई
अमरावती ग्रामीण डिव्हिजनच्या भातकुली सबडिव्हीजन अंतर्गत वलगाव उपकेंद्रात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. दोन जणांनी उपकेंद्राच्या टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली तसेच ऑन ड्युटी ऑपरेटरला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी खिडकीचे तावदान फोडले. शासकीय दस्तावेज जाळले. आमच्याकडे लाईट राहत नाही. तुम्ही ऑफिसमध्ये बसून करता काय असा जाब या तरुणांनी विचारला. तसेच कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उपकेंद्रात गोंधळ निर्माण झाला. स्थानिक पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपांविरूद्ध पाच कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.