सुषमा अंधारे आज राणा दाम्पत्याच्या मतदारसंघात; कोणती उणीदुणी काढणार?

इकडे नवनीत अक्का हातपाय आपटतात. तिकडे नारायणरावांची मुलं हातपाय आपटतात. या लहान पोरांवर अजिबात रागवू नये.

सुषमा अंधारे आज राणा दाम्पत्याच्या मतदारसंघात; कोणती उणीदुणी काढणार?
| Edited By: | Updated on: Mar 03, 2023 | 11:02 AM

अमरावती : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सध्या शिवगर्जना सप्ताह सुरू आहे. याअंतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुषमा अंधारे या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावती जिल्ह्यात सुषमा अंधारे यांच्या चार मोठ्या जाहीर सभा होणार आहेत. विशेष म्हणजे बडनेराचे आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघात या सभा होणार आहेत. बडनेरा येथील नवी वस्तीतील आठवडी बाजारात सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. कार्यकर्त्यांकडून सभेची तयारी सुरू आहे.

राणा दाम्पत्यांच्या टीकेला कसं उत्तर देणार

उद्धव ठाकरे यांच्याकडून बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळालं होतं. पण, बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांची सभा घेतली जात असल्याचं बोललं जातं. याशिवाय राणा दाम्पत्य उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमी टीका करत असतात. अंजनगाव, अचलपूर, चांदूर रेल्वे आणि बडनेरा या चार ठिकाणी सभा होणार आहेत. बडनेरा येथे सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. या सभेला उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. आमदार रवी राणा तसेच खासदार नवनीत राणा या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. या टीकेला सुषमा अंधारे कसं उत्तर देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

इकडे नवनीत अक्का, तिकडं…

संजय राऊत यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचं नारायण राणे यांचे पुत्र म्हणाले होते. त्यावर बोलताना काल बुलढाण्यात बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, जाऊ द्या हो. कुठं बारक्या-बारक्या लेकरांचं आपण मनावर घ्यायचं. त्यांच्याबद्दल सिरीअस विचार करायचा नाही. लहान लेकरू हाय बोलत असते. आपण त्याचं कौतुक करायचं. लाडाने त्याला चुचकारायचं, गोंजारायचं. काही लेकरांना सतत लक्ष वेधून घ्यायची सवय असते. नारायणरावांच्या लेकरांकडं भाजप काहीही केल्याने लक्ष देत नाही. इकडे नवनीत अक्का हातपाय आपटतात. तिकडे नारायणरावांची मुलं हातपाय आपटतात. या लहान पोरांवर अजिबात रागवू नये.