
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी नुकतीच कर्ली टेल्स या लोकप्रिय फूड आणि ट्रॅव्हल चॅनलला मुलाखत दिली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी ही मुलाखत पार पडली. या मुलाखतीत त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य, नागपूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास, सोशल मीडिया ट्रोलिंग आणि घरगुती गप्पा अशा अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेबद्दल अत्यंत खुमासदार आणि अनपेक्षित उत्तर दिले. ज्यामुळे त्या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत.
या मुलाखतीत अमृता फडणवीसांना एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. जर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रोल एक्सचेंज करण्याची किंवा एक दिवस मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय कराल? असा प्रश्न अमृता फडणवीसांना विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीसांनी उत्तर अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिकपणे उत्तर दिले.
खरं सांगू तर देवेंद्र फडणवीसांनी इतकं काय केलं आहे तर मला स्कोप फार कमी आहे. त्यांनी मुंबई महाराष्ट्रात ठिकठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केले आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी जो काही भ्रष्टाचार सुरु होता, तो कमी केला आहे. त्यामुळे प्रत्येक ऑफिसरमध्ये एक भीती निर्माण झाली आहे. यामुळे ते भ्रष्टाचारापासून दूर आहेत किंवा ते करण्यापासून पकडले जातील याची त्यांना भीती वाटते. त्यांनी असे अनेक असे प्रोजेक्ट करण्याचा विचार केला आहे. जसे वन गार्ड, नदीजोड प्रकल्प अशा अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मी एक दिवस जर मुख्यमंत्री बनली तर मी सुट्टी घेऊन माझे पती आणि मुलीसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जाईल. तिथे छान आनंद घेईन, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान अमृता फडणवीस यांच्या या विधानामुळे त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किती महत्त्व देतात, हे अधोरेखित झाले आहे. यावेळी त्यांनी गंभीर राजकीय विषयावरही अत्यंत हलक्याफुलक्या पद्धतीने उत्तर दिले. तसेच यावेळी त्यांनी एकाच वेळी पतीच्या कामाचे कौतुक आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यांचे हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, त्यांच्या चाहत्यांकडून त्याला मोठी पसंती मिळत आहे.