अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता (Anil Deshmukh Viral Photo with Criminals)

अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल
| Updated on: Feb 02, 2021 | 9:29 AM

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना हा फोटो काढल्याची माहिती आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. (Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)

एक गुटखाकिंग, दुसरा ट्रकचोर

गुन्हेगारांनी पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांचं स्वागत केल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या तिन्ही गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गुन्हेगारांपैकी एक गुटखा किंग, तर दुसरा ट्रक चोर आहे. एका आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

तिन्ही गुन्हेगार माजी नगरसेवक

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता. जफर बिल्डर आणि सय्यद मतीन यांनी औरंगाबाद महापालिकेत गोंधळ घालून महापौरांवर खुर्च्या फेकल्या होत्या. सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

अनिल देशमुख चार दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

शक्ती कायद्याचा पुनरुच्चार

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा महत्त्वाचा आहे. कायद्याची चौकट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कमी वेळेत निकाल लागणं गरजेचं आहे. समितीत सर्वपक्षीय आमदार आहेत. नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये बैठक झाली. सर्व सूचना ऐकून घेतल्या.
कायद्याचं प्रारुप आम्ही विधानसभेत ठेऊ. महिलांविरोधी गुन्ह्याचा 21 दिवसात तपास झाला पाहिजे. आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. (Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)
महिलेने खोटी तक्रार केल्याचं तपासात उघड झालं, तर कारवाई होणार, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. 36 कोर्ट सुरु करणार असून
विशेष टीम तपास करणार, साडे बारा हजार पोलिसांची भरती करणार असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी औरंगाबाद दौऱ्यात दिली होती.

संबंधित बातम्या :
भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी
भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा
(Anil Deshmukh Viral Photo with Criminals in Aurangabad)