
Anjali Damania Allegations On Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या कामाच्या अनोख्या शैलीमुळे ओळखले जातात. त्यांच्या खात्यात सध्या काय चालू आहे याची इत्यंभूत माहिती त्यांना असते. विशेष म्हणजे त्यांच्या विभागामार्फात कोणत्या ठिकाणी किती कोटींचे काम चालू आहे याचा आकडा त्यांना तोंडपाठ असतो. दरम्यान, आता याच नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर आता महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आज (25 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी हे आरोप केले आहेत.
नितीन गडकरी यांनी लोकांची पूर्णपणे आर्थिक फसवणूक केली आहे. गडकरी यांनी लोकांच्या डोक्यावर रस्ते, टोल थोपवले. रस्ते आणि टोल यांच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा आयडीएल नावाच्या कंपनीत आला. आयडीएल कंपनीतून हा पैसा नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला, असा खळबळजनक आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच नितीन गडकरी यांना एक्स्प्रेस वे मॅन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. त्यांचा गौरव केला जातो. पण हेच नितीन गडकरी प्रत्येक किलोमिटरमागे पैसे खात आहेत. टोलच्या माध्यमातून ते पैसे खात आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
नितीन गडकरी यांच्यावर मी सकाळी ११ वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे.
I will be taking a Press Conference against Minister for Roads Transports and Highways at 11 am today
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 25, 2025
दरम्यान, अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर आता नितीन गडकरी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर ते काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याआधी अंजली दमानिया यांनी 24 सप्टेंबर रोजी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी मी गडकरी यांच्याविरुद्धची पत्रकार परिषद 25 सप्टेंबर रोजी घेईन असे सांगितले होते. महाराष्ट्रात भीषण पूर परिस्थिती आहे. लोकांची घरे आणि पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना आज आम्ही आमच्यापरीने मदत पोहोचवू. अशा स्थितीत मी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं योग्य होणार नाही. मी आज संध्याकाळच्या ऐवजी उद्या सकाळी गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद घेईन, असे दमानिया यांनी एक्स या समाजमाध्यमावर सांगितले होते.
गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद मी उद्या घेईन
महाराष्ट्रात भीषण पूर परिस्थिती आहे. लोकांची घरे आणि पीकं उध्वस्त झाली आहेत. त्यांना आज आम्ही आमच्यापरेने मदत पोहोचवू.
अशात मी भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणं योग्य होणार नाही. मी आज संध्याकाळच्या ऐवजी उद्या सकाळी गडकरींविरुद्ध पत्रकार परिषद…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 24, 2025
अंजली दमानिया यांनी 23 सप्टेंबर रोजीदेखील गडकरी यांच्याविरुद्ध एक ट्विट केले होते. मी नितीन गडकरी यांची पोलखोल करायला सुरुवात करणार आहे.. मी त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता. त्यानंतर दमानिया गडकरी यांच्याबाबत नेमकं काय सांगणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता त्यांनी गडकरी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.