
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी विविध राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात अत्यंत भयानक आणि विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली नसल्याचे सांगत, कायद्याचा धाक फक्त सामान्य लोकांनाच असू शकतो, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
अंजली दमानिया यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी भाष्य केले. माणिकराव कोकाटे यांचे रम्मी खेळतानाचे दृश्ये व्हायरल झाले होते. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना बोलता येत नव्हते, त्यांचे ततपप होत होते. मोबाईल नंबर काय सांगितला, बोलत असताना त्यांना काही सूचत नव्हते. शेतकऱ्यांची कळवळ आहे, अशी पत्रकार परिषद सुरू केली. पण पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नव्हती. यानंतर त्यांनी त्यांच्यावर केस करेल, असे म्हणत मी दुसरे काही तरी करत होतो. त्यात तो व्हिडिओ आला असे सांगण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना संवेदनशील कृषी मंत्री हवे आहेत. त्यांच्यावर कृपा करा आणि तुमचा राजीनामा द्या. ओसाड गावच्या पाटीलाचा राजीनामा मिळालाच पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
“माणिकराव कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी काही जणांनी लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्यासमोर पत्त्याचे कॅट टाकले तेव्हा सुरज चव्हाणकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्यावर अतिशय गंभीर असे 8 सेक्शन लागले आहे. गंभीर सेक्शन लागले असताना त्यांना अजून अटक झालेली नाही. सुरज चव्हाण यांनी केवळ संघटनात्मक पदाचा राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाच्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. राजीनामे सोडा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. त्यांना सांगायचे आहे की महाराष्ट्र आता हे खपवून घेणार नाही”, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
“अंजली दमानिया यांनी संजय शिरसाट यांच्यावर त्यांच्या विभागातील अनियमिततांवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल टीका केली. तसेच संजय गायकवाड यांच्या मारामारी प्रकरणावरही त्यांनी फक्त तक्रार दाखल झाल्याबद्दल आक्षेप घेतला. योगेश कदम यांच्या ‘सावली’ डान्स बार प्रकरणाचा उल्लेख करत, त्यांनी कारवाईची मागणी केली असतानाही ती झाली नसल्याचे सांगितले. बीडमधील एका डान्स बारवरील कारवाईसाठी पाठपुरावा करूनही काहीच झाले नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इतके सर्व होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांना पाठीशी घालत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच “राज्यातील हनी ट्रॅप प्रकरण अत्यंत गंभीर आहे. मी 6 दिवस मुंबईत नव्हते. मी मलेशियात होती. परंतु मी 2 लोकांशी बोलून याबद्दलची माहिती मागवली आहे. लवकरच याबद्दलचा सर्व तपशील उपलब्ध होईल”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.