एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे भोंदू खरातशी असंख्य कॉल्स, डिटेल्स कुणी पुरवली? अंजली दमानिया यांचं थेट उत्तर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआरची प्रतच बाहेर आणली. त्यात कोणी कोणी खरातला सर्वाधिक वेळा फोन केला याची कुंडलीच बाहेर काढली. या सर्व गोष्टींचे डीटेल्स कुठून मिळाले याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करुन त्यांचा बलात्कार केला. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अशोक खरातचे राजकीय लोकांसोबत असलेले कनेक्शन समोर आले. अनेक बड्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर खरातला कुणाचे सर्वाधिक फोन कॉल झाले, कोणत्या नेत्याशी तो कितीवेळ बोलला, त्याने कोणत्या नेत्याला कितीदा फोन केले, तर त्याला कोणत्या नेत्याने कितीवेळा फोन केला, दोघांमध्ये कितीवेळा बोलणे झाले याची इत्यंभूत माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बाहेर आणली. ती माहिती त्यांना कशी मिळाली याबाबत अंजली दमानिया यांनी माहिती दिली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्यांना या प्रकरणातील माहिती कशी मिळाली हे सांगितली आहे. “आज सकाळी मला असंख्य लोकांकडून, जयश्री खाडीलकर आणि प्रकाश महाजन यांच्या क्लिप्स आल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे ही सीडीआर कशी आली, काय आली? याची तर पूर्ण डिटेल मी माझ्या ऑडीओमध्ये दिले होते. त्यांनी ते नीट ऐकणं गरजेचं होतं. मला एका अनोळखी व्यक्तीकडून ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्या पर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं. पण, ही माहिती मी आधी डीजी ऑफिस, सीएम ऑफिस आणि तेजस्वी सातपुते ज्या एसआयटीच्या अध्यक्षा आहेत त्यांच्याकडे पाठवली होती हे देखील मी ऑडीओ क्लिपमध्ये बोलले” असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, “त्यानंतर दोन दिवसांनंतर त्याची मी एआयद्वारे पूर्ण इनवेस्टिगेट केलं की ही खरी आहे की नाही. तर त्याच्यामध्ये जेव्हा कळालं की ही सीडीआर जेन्युअन आहे त्यानंतर मी ही सगळी मला वाटलं जनतेपुढे आणणं गरजेचं आहे. जनतेच्या न्यायालयात आणणं गरजेचं आहे. म्हणून मी ही सगळी माहिती पब्लिक केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशी केली क्लॉडवर टाकून, प्रत्येक नंबर व्हेरिफाय करुन अख्खी लिस्ट मला एआय थ्रू मिळाली. ते सुद्धा मी माझ्या अख्या फाइंडिंग सकट सगळ्या मीडिया चॅनेल्सला पाठवलेलं आहे हे त्यांनी आधी जाणून घ्यावं. त्यानंतर मग काय ते बोलावं. पण मला गंमत अशी वाटते की प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकरसुद्धा यांनी कुठचाच व्हिडीओ हा खरातांविरुद्ध केलेला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, जादूटोण्याच्या अघोरी प्रकारांवर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडीओ करतात. असो मला काही फरक पडत नाही. मी जे काम करीन ते कायद्याला धरूनच करेन आणि तसं मी करेन.”
एकनाथ शिंदे आणि चाकणकरांनी किती कॉल केले?
रुपाली चाकणकरच नाही तर अनेक नेत्यांनी अशोक खरात याला कॉल केले, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केले होते. रूपाली चाकणकर यांनी एकूण 177 कॉल खरातला केले आहेत. यामध्ये दोघांमध्ये 33 हजार 727 सेकंदाचे संभाषण झाले. तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांनी भोंदू खरातला 236 कॉल केले आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सतरा कॉल आहेत. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत. या 17 कॉल्समध्ये 10 इनकमिंग, 7 आऊटगोईंग कॉल्स झाले आहेत असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता.