माझी 22 उपोषणं झाली पण… धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंचे विधान चर्चेत

Anna Hazare : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमाम्यावर भाष्य केले आहे. अण्णा हजारे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

माझी 22 उपोषणं झाली पण... धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंचे विधान चर्चेत
Anna hajare on Dharmendra Pradhan Resign
Image Credit source: Google
| Updated on: Jul 25, 2026 | 7:28 PM

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरसह देशातील विविध ठिकाणी आनंद व्यक्त केला जात आहे. देशभरातील वेगवेगळ्या नेत्यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही प्रधान यांच्या राजीमाम्यावर भाष्य केले आहे. अण्णा हजारे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

काय म्हणाले अण्णा हजारे?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे विद्यार्थ्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले आहे. यावर बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले की, कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत. माझी 22 उपोषणे झाली पण कधी हिंसा केली नाही. राजीनाम्यानंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही. मात्र समाजाच्या भलाईसाठी जे जे करता येईल ते करत रहा.

अण्णा हजारेंनीही केले होते मौन आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये मौन आंदोलन केले होते. आंदोलनाआधी त्यांनी सरकारकडून दडपशाही नव्हे, तर संवाद हवा, अशी भूमिका बॅनरच्या मार्फत स्पष्ट केली होती. तसेच नीट पेपरफुटी , बेरोजगारी, भरती प्रक्रियांवरून चिंता व्यक्त करत सरकारने संवाद साधून प्रश्न सोडवायला हवेत, अशी मागणी देखील त्यांनी केली होती.

CJP कडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा

आज सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर CJP कडून आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणारे CJPचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या तिसऱ्या फेरीतील चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, आंदोलन सुरू करण्यापूर्वी त्यांच्या तीन प्रमुख मागण्या होत्या. यातील पहिली मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची होती. दुसरी मागणी आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेण्याची होती आणि तिसरी मागणी आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या लोकांसाठी 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाई देण्याची होती, या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर CJP ने आंदोलन मागे घेण्याची मागणी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us