देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी; अण्णा हजारेंची उपोषणाआधीच माघार

| Updated on: Jan 29, 2021 | 7:24 PM

अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे | Anna Hazare

देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी; अण्णा हजारेंची उपोषणाआधीच माघार
केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाल्याचे मान्य केले. त्यावर केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी नियोजित उपोषण मागे घेत असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.
Follow us on

अहमदनगर: ज्येष्ठ समाजेसवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 30 जानेवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला होता. अण्णा हजारे यांच्या या निर्णयानंतर शुक्रवारी भाजपचे नेते राळेगणसिद्धीत ठाण मांडून बसले होते. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपला उपोषणाचा निर्णय मागे घेतला. (Anna Hazare will takes back hunger strike decision for farmers demands)

यानंतर अण्णा हजारे, देवेंद्र फडणवीस आणि कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकारपरिषद पार पडली. केंद्र सरकारने शेतकरी हिताच्या निर्णयांना उशीर झाल्याचे मान्य केले. त्यावर केंद्र सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे मी नियोजित उपोषण मागे घेत असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.

उच्चस्तरीय समिती स्थापन करायला उशीर झाल्याची चूक आम्हाला मान्य: फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले. उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला उशीर झाला हे आम्ही मान्य करतो. अण्णांच्या मागण्या ऐकून मी आणि गिरीश महाजन दिल्लीला गेलो होतो. आम्ही केंद्र सरकारसमोर अण्णांच्या मागण्या ठेवल्या. यावर सखोल चर्चा झाल्यानंतर उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय कृषीमंत्री या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील. या समितीत नीती आयोगातील तज्ज्ञ व्यक्तींचाही समावेश असेल. तसेच अण्णा हजारे यांनी सुचविलेल्या व्यक्तींनाही या समितीमध्ये समाविष्ट करून घेण्यात येईल. ही समिती येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सातव्या भेटीत भाजपच्या प्रयत्नांना यश

तब्बल सात भेटी घेऊन चर्चा केल्यानंतर अण्णा हजारे यांना उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यात भाजपला यश आले आहे. यापूर्वी सहावेळा भाजपचे प्रयत्न फोल ठरले होते.

अण्णांनी उपोषण करू नये म्हणून भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी गुरुवारी सहाव्यांदा अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. मात्र तरीही अण्णांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले होते.

अण्णा हजारेंनी काय म्हटले होते?

गेल्या चार वर्षांपासून मी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेताना दिसत नाही. सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता उरलेली नाही. त्यामुळे मी येत्या 30 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले होते.

संबंधित बातम्या:

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, दिल्लीतही एवढा त्रास झाला नव्हता : गिरीश महाजन

(Anna Hazare will takes back hunger strike decision for farmers demands)