‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

यापूर्वी 21 तारखेला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. | Girish Mahajan meets Anna Hazare

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 17:25 PM, 24 Dec 2020
'संकटमोचक' गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप पक्ष सध्या सावध आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी फडणवीस सरकारच्या काळात संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्य मनधरणीचा प्रयत्न केल्याचे समजते. (BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi)

काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. तसे पत्रही अण्णांनी केंद्र सरकारला पाठवले होते. यापूर्वी 21 तारखेला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी देखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. त्यानंतर आता गिरीश महाजनही अण्णा हजारे यांना भेटायला आले. त्यामुळे अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन न करण्यासाठी थेट केंद्रातून हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत.

गिरीश महाजन यांनी आज अण्णा हजारे यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करु नये, अशी विनंती महाजन यांनी केली.

महाजनांकडून यापूर्वीही अण्णा हजारेंशी यशस्वी शिष्टाई

30 जानेवारी 2019 रोजी अण्णांनी केलेले उपोषण सोडण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गिरीश महाजनही अण्णा हजारे यांच्याकडे आले होते. यावेळी अण्णांना आश्वासन देण्यात होते. मात्र, अद्यापही अण्णांच्या मागण्या मान्य न झाल्याने अण्णांनी नव्याने आंदोलनाचा इशारा दिला. अण्णांनी केलेल्या मागण्या रास्त असून केंद्र सरकारही त्याच मार्गाने जात असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. तसेच अण्णा हजारे यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

कृषी कायद्यांबाबत अण्णा हजारे समाधानी?

कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत अण्णा हजारे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सिमीत आहे, असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते.

मात्र, अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या इतर समस्यांसाठी आंदोलन छेडल्यास भाजपची राजकीय कोंडी होऊ शकते. यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर उपोषण केले होते. या आंदोलनाला देशव्यापी प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे काँग्रेस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. ही शक्यता लक्षात घेता भाजप यावेळी अण्णा हजारे यांच्याबाबत कोणताही धोका पत्कारण्यास तयार नाही.

संबंधित बातम्या:

‘अहंकाराची खुर्ची सोडा आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्या’, कृषी कायद्यांवरुन राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कृषी कायद्यावरुन भाजप Vs पवार, पवारांच्या आत्मचरित्राचा दाखला देत फडणवीसांकडून घेरण्याचा प्रयत्न

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

(BJP leader Girish Mahajan meets anna hazare in ralegansiddhi)