सरकारी कार्यालयात खुर्च्या कमी, टेकूच जास्त, डळमळणाऱ्या इमारतीत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात

| Updated on: Mar 30, 2021 | 1:49 PM

प्रशासकीय आणि हिशोब खाते विभागातील धोकादायक छताकडे कोणी लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे. (APMC Market administrative building)

सरकारी कार्यालयात खुर्च्या कमी, टेकूच जास्त, डळमळणाऱ्या इमारतीत कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी प्रशासकीय इमारत टेकूच्या आधारावर उभी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी काम करणारे अनेक कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. यामुळे अभियंताच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली आहे. यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (APMC Market administrative building stands on a support base)

शेकडो कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून टेकूच्या सहाय्याने चालत आहे. त्यामुळे अनेक व्यापारी आणि कामगार दररोज जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. तर आता प्रशासकीय इमारतीत अनेक ठिकाणी टेकू लावल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. या सर्व धक्कादायक प्रकारानंतर कांदा बटाटा मार्केटमधील अभियंताच्या भोंगळ कारभार चव्हाटयावर आला आहे.

इमारतीच्या छताचा मलबा पडत असल्याने टेकू

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधील प्रशासकीय इमारत ही 30 वर्ष जुनी आहे. त्यामुळे या इमारतीच्या छताचा मलबा पडत असल्याने येथे टेकू लावल्याचे दिसून आले आहे. यामुळे हे जुन्या इमारतीचे संपूर्ण छतच कोसळण्याच्या भीती वर्तवली जात आहे. या शेकडो कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून एपीएमसीची ओळख आहे. या बाजारपेठेत वर्षाला जवळपास 10 हजार हजारो कोटींची उलाढाल होते. त्यामुळे या प्रशासनाच्या इमारतीलाच टेकू दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे. पण प्रशासकीय आणि हिशोब खाते विभागातील धोकादायक छताकडे कोणी लक्ष देत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता

संबंधित कर्मचाऱ्यांनी उप अभियंता यांना याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. पण हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांव्यतिरिक सभापती, संचालक आणि विविध विभागांचे प्रमुख या ठिकाणी वावरत असतात. या इमारतीतून सभापती आणि संचालक अखंड बाजार समितीची देखभाल करतात.  पण याच इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या ठिकाणी छताला लावण्यात आलेले प्लाय आणि लोखंडी टेकू हे दिर्घ कालावधीच्या भाडेतत्वावर घेण्यात आले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या मालिकेच्या अनेक इमारती बांधून तयार आहे. पण तरीही धोका पत्करुन राहण्यात काय स्वारस्य? असा देखील सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या इमारतीत स्थलांतरित करा, अशी मागणी केली जात आहे.  (APMC Market administrative building stands on a support base)

संबंधित बातम्या : 

कोरोना रोखण्यासाठी मुंबईतील वॉर्ड वॉर रुम सक्रिय करा, शिक्षकांचीही मदत घ्या; पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईच्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळे अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात भेट