2 कोटी वाहनांनी हायसिक्युरिटी नंबरप्लेटसाठी केला अर्ज,पण..प्रत्यक्षात इतक्याच वाहनांनी आतापर्यंत नंबरप्लेट बदलली..
राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट ( HSRP ) बसविण्यासाठीची मोहिम बारगळली आहे.

वाहनांच्या सुरक्षेसाठी त्यांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याची मोहित राज्याच्या परिवहन विभागाने राबवलेली असली तरी या HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही हे काम धिम्या गतीने सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात तीन संस्थांना ही नंबरप्लेट बसवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्यातील सुमारे २ कोटी वाहन चालकांनी या नंबरप्लेट बसवण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यापैकी केवळ ९८ लाख वाहनांनीच आतापर्यंत आपली नंबरप्लेट सुरक्षित केली असल्याची आकडेवारी बाहेर आलेली आहे.
वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्याचे केंद्रीय वाहतूक मार्ग मंत्रालयाचे धोरण आहे. राज्यातील परिवहन विभागाने राज्यातील जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी वारंवार मदुतवाढ दिली आहे. नवीन वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्याचे काम डिलरकडेच सोपवल्याने नवीन वाहनांना ही नंबरप्लेट लागलीच बसवण्यात येत असते. मात्र, जुन्या वाहनांना अद्यापपर्यंत या नंबरप्लेट बसवण्यात आलेल्या नाहीत अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वाहन क्रमांकाच्या नंबर प्लेट डुप्लिकेट तयार करता येत नाहीत. त्यामुळे वाहनांचा गुन्हेगारी कृत्यासाठी वापर होण्याचा धोका टळतो.
राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार होती. तसेच HSRP नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्याची तरतूद होती.