अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना… संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा राजकीय संबंध असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी एसआयटी तपासात मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरातप्रकरणी अनेक बळी जाणार, देवेंद्र फडणवीसांना... संजय राऊतांनी फोडला मोठा बॉम्ब
sanjay raut ashok kharat
| Updated on: Apr 12, 2026 | 11:44 AM

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता एका वेगळ्याच वळणावर आला आहे. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धेचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती अशोक खरातचे काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलीच टीका केली. अशोक खरात फाशीवर जाईल, त्याला जन्मठेप होईल या सर्व गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी येणार आहेत, ज्या कागदावर आहेत, जे अत्यंत गोपनीय आहे, ते समोर आल्यानंतर जे वादळ येईल ते महत्त्वाचे आहे, असे विधान संजय राऊत यांनी दिले.

CDR मला कोणी देणार नाही

अशोक खरातचे प्रकरण साधं नाही. त्याला राजकीय अँगल आहे. खरातच्या चौकशीमध्ये पोलिसांनी ज्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसं की कोण किती मिनिटं बोललं, कोणाशी बोललं, ही माहिती गोपनीय असते. पण ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या मदतीने ती बाहेर आली. कोणाला तरी ती माहिती बाहेर काढायची आहे. खरातशी कोणते नेते कधी, किती मिनिटं, किती वेळा बोलले. ही अत्यंत गोपनीय माहिती आहे. ही माहिती कोणाच्या व्हॉटसअॅपवर सहज येत नाही. मी इतके वर्ष खासदार आहे. पण मला सीडीआर मिळणार नाही. मला कोणी देणार नाही, ज्याच्या हातात सूत्र आहेत. ते गृहमंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्या मदतीशिवाय तुम्हाला सीडीआर मिळू शकत नाही, असे संजय राऊतांनी सांगितले.

फडणवीसांना अशा शिकारीचा नाद

त्यामुळे रोहित पवार जे म्हणतात ते खरं आहे खरातच्या माध्यमातून अनेक गोष्टी उघड केल्या जात आहेत. अशोक खरातचे पायाशी बसून फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे काही उपद्व्याप करत होते. त्याची माहिती समोर आली की आपोआप सर्वांचे बळी जातील. देवेंद्र फडणवीस यांचा बळी घेणं हा छंद आहे. फडणवीसांना अशा शिकारीचा नाद आहे. अशोक खरात फाशीवर जाईल, त्याला जन्मठेप होईल या सर्व गोष्टी सोडून द्या. खरात फाईल्समधून ज्या गोष्टी येणार आहेत, ज्या कागदावर आहेत, जे अत्यंत गोपनीय आहे, ते समोर आल्यानंतर जे वादळ येईल ते महत्त्वाचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us