तो एक भ्याड हल्ला… सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न, शरद पवारांपासून राजेंद्र गवईंपर्यंत संतप्त प्रतिक्रिया काय?

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे, त्यानंतर विविध क्षेत्रातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

तो एक भ्याड हल्ला... सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न, शरद पवारांपासून राजेंद्र गवईंपर्यंत संतप्त प्रतिक्रिया काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2025 | 5:56 PM

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सुनावणी दरम्यान वकिलाकडून सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच अडवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. या वकीलाला जेव्हा कोर्टाबाहेर काढण्यात आलं तेव्हा तो जोरजोरात आरडाओरड करत होता.   सनातनचा अपमान सहन करणार नाही’ असं तो म्हणत होता. दरम्यान सरन्यायाधीशांवर झालेल्या या हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून, या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. 

शरद पवार यांची प्रतिक्रिया 

लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्याय्य भूमिकेकडे जाण्यासाठी न्यायव्यवस्था असते. त्याच न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तींवरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणं हा केवळ न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.

आपल्या देशात पेरलं जाणारं विष आता संविधानाच्या सर्वोच्च संस्थांनाही जुमानत नाही, ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. ह्या घटनेचा मी निषेध करतो व कोणत्याही परिस्थितीत भारतीय लोकशाहीचे स्तंभ कमकुवत होणार नाहीत, ह्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याची ग्वाही देतो. असं शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया  

आज सर्वोच्च न्यायालयात भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. द्वेष पसरवण्यासाठी सांप्रदायिक शक्ती किती टोकाला जाऊ शकतात, याचे हे उदाहरण आहे. हा हल्ला संविधानावरचा हल्ला आहे, भारताच्या मूळ संकल्पनेवरचा हल्ला आहे. या असहिष्णुतेला प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांवर सरकारने कठोर कारवाई करावी, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया 

सनातन का अपमान नहीं सहेंगे… एक सडक्या मनोप्रवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट माननीय मुख्य सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो…. जेव्हा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात सर न्यायाधीश आले होते तेव्हा तर थेट राज्य सरकारने प्रोटोकॉल दिला नाही…. ह्या घटना कसल्या द्योतक आहेत…ढासळणाऱ्या मानसिकतेच्या आणि एक सनकीं डोक्याने भरलेल्या ज्वराचा…. असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवांरकडून कारवाईची मागणी  

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला लोकशाही आणि संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा आज अपमान झाला आहे. सनातनी हिंसक कसे होऊ शकतात? न्यायालयाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर भ्याड हल्ला करणे म्हणजे देशात गुंडगिरी सुरू आहे. ही गुंडगिरी करायला पाठबळ कुठून मिळते, असा सवाल उपस्थित होतो. हिंदू धर्माचे नाव घेऊन असे कृत्य करणाऱ्या या विकृत वृत्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे! अशी मागणी विजय वड्डेट्टीवार यांनी केली आहे.

राजेंद्र गवई यांची प्रतिक्रिया  

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधू राजेंद्र गवई यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध केला आहे.  मला जेव्हा कळलं की हल्ला झाला आहे, तो एक भ्याड हल्ला आहे. मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका व्यक्तीचा हा हल्ला वाटतो. फुले शाहू विचारांच्या अनुयायांना सांगतो कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे,  आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत, त्यांच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, असं राजेंद्र गवई यांनी म्हटलं आहे.