Aurangabad 30-30 Scam: आरोपी म्हणतो, आता मी ब्लॉक झालोय, डायरीत 300 कोटींच्या नोंदी, महाराष्ट्राबाहेरही एजंट!

या प्रकरणी तक्रार केल्यास पैसे मिळण्याची जेवढी आशा आहे, तीदेखील लयास जाईल, अशी गुंतवणूकदारांची भावना आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भीतीपोटी तक्रारी केल्या नाहीत. मात्र लोकांनी तक्रार केली तरच घोटाळ्यातील आणखी आरोपी आणि एजंटांपर्यंत पोहोचता येईल,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Aurangabad 30-30 Scam: आरोपी म्हणतो, आता मी ब्लॉक झालोय, डायरीत 300 कोटींच्या नोंदी, महाराष्ट्राबाहेरही एजंट!
औरंगाबादमधील 30-30 घोटाळ्याचा सूत्रधार संतोष राठोड
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 9:47 AM

औरंगाबादः 30-30 योजनेत (30-30 Scam) गरीब शेतकरी आणि सामान्य जनतेचे पैसे गुंतवून कोट्यवधींचा घोटाळा मास्टरमाइंड संतोष उर्फ सचिन राठोड याच्या पोलीसी चौकशीतून रोज नवे धागेदोरे हाती लागत आहे. या घोटाळ्यातील गुंतवणुकीत परराज्यातील एजंटचाही हात असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यातील बहुतांश व्यवहार लेखी झाले नसल्याने गुंतवणुकदारांचे (Investors ) कोट्यवधी रुपये बुडाल्यात जमा होतात की काय अशी भीती आहे.  विशेष म्हणजे, आरोपीच्या बँक खात्यात काहीही रक्कम नाही. त्यामुळे त्याने इतरत्र कुठे कुठे रक्कम वळती केली आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत. औरंगाबादमध्ये अटक झाल्यानंतर आता मी पूर्णपणे ब्लॉक झालोय, अशी कबुली संतोष राठोडने (Santosh Rathod) दिली आहे.

आरोपींची यादी वाढतीच

शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी प्रोजेक्ट अंतर्गत जमीन अधिग्रहित झालेल्या शेतकऱ्यांकडे सरकारकडून मावेजात आलेले लाखो रुपये होते. त्यानंतर संतोषने अशा लोकांसाठी 30-30 ही गुंतवणुकीची योजना आणली. सुरुवातीला त्याने लोकांना परतावा दिला. मात्र तीच रक्कम पुन्हा गुंतवायला सांगितले. अशा प्रकारे या योजनेची व्याप्ती बिडकीन, पैठण तसेच महाराष्ट्रातील इतरही ग्रामीण भागात पोहोचली. बहुतांश शेतकऱ्यांनी हे व्यवहार लेखी स्वरुपात केले नाहीत. त्यामुळे ते तक्रार करायलाही पुढे येत नव्हते. अखेर 22 जानेवारी रोजी बिडकीनच्या दौलत जगन्नाथ राठोड यांच्या तक्रारीवरून 30-30 घोटाळ्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीतून संतोषला अटक झाली. 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संतोषचा सहकारी कृष्णा एकनाथ राठोड, पंकज शेषराव चव्हाण, नाशिकचा मध्यस्थ शकील लियाकत, परभणीचा नातेवाईक सूर्यकांत नामदेवराव राठोड व कोलकात्याचा सुशील यादव पटेल यांना या घोटाळ्यात पोलिसांनी आरोपी केले.

खात्यात 150 कोटींचे व्यवहार, डायरीत 300 कोटी

दरम्यानस पोलिसांनी संतोष राठोडच्या घराची झडती घेतली असता गुंतवणुकदारांचा हिशेब असलेली डायरी त्यांना सापडली. डायरीत 300 कोटींच्या नोंदी आहेत. संतोष व त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या दोन बँक खात्यावरून जवळपास 100 ते 150 कोटींचा व्यवहार झाला. उर्वरीत 150 कोटींचा हिशेब केवळ शब्दावरच झाल्याची कबुली संतोषने दिली. बिडकीनचे सहायक निरीक्षक माने यांच्यासह आर्थिक दुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे- पोलीस

या प्रकरणी तक्रार केल्यास पैसे मिळण्याची जेवढी आशा आहे, तीदेखील लयास जाईल, अशी गुंतवणूकदारांची भावना आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भीतीपोटी तक्रारी केल्या नाहीत. मात्र लोकांनी तक्रार केली तरच घोटाळ्यातील आणखी आरोपी आणि एजंटांपर्यंत पोहोचता येईल. तक्रारदारांना कोणताही त्रास होऊ न देता त्यांचा पैसा परत मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे. तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी केले आहे.

इतर बातम्या-

TET Exam : तब्बल 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केलं! एका परीक्षार्थीकडून किती रुपये घेतले?

Bhiwandi | भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरुमसह कारखान्यास भीषण आग, लाखोंचे नुकसान