मोबाइल घरीच, चिठ्ठीत कारण लिहिलं, औरंगाबादचे व्यावसायिक 5 दिवसांपासून बेपत्ता

| Updated on: Oct 13, 2022 | 9:51 AM

1 कोटी कर्जाची परतफेड करूनही खासगी सावकारांना त्रास संपत नाहीये, अशा आशयाची तक्रार नांदेडकर यांनी चिठ्ठीत केल्याचं म्हटलं जातंय. ही चिठ्ठी अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

मोबाइल घरीच, चिठ्ठीत कारण लिहिलं, औरंगाबादचे व्यावसायिक 5 दिवसांपासून बेपत्ता
Image Credit source: social media
Follow us on

दत्ता कनवटे, औरंगाबादः शहरातील बांधकाम व्यावसायिक (Builder) पाच दिवसांपासून बेपत्ता (Missing) आहेत. खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी घर सोडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. शहरातील बिल्डर  नंदकिशोर रामराव नांदेडकर (Nandkishor Nandedkar) हे 9 ऑक्टोबर पासून बेपत्ता आहे. त्यांनी घर सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

बिल्डर नंदकिशोर रामराव नांदेडकर हे साताऱ्यातील विजयंत नगर येथे राहात होते. 9 ऑक्टोबरला ते घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी मोबाइलही घरीच ठेवला होता. बराच वेळ झाला, ते घरी आले नाहीत, हे पाहून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.

नांदेडकर यांनी घरी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ते तणावाखाली होते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. चिठ्ठीत त्यांनी 6 ते 7 जणांचा उल्लेख केला आहे. या लोकांकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं.

हे कर्ज जवळपास 1 कोटी रुपयांचं होतं, असा उल्लेख त्यांनी चिठ्ठीत केला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नांदेडकर यांचा शोध सुरु केला आहे.

त्यांनी मोबाइल घरीच ठेवलेला असल्यामुळे लोकेशनदेखील ट्रेस करता येत नाहीये. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने चिठ्ठीत नेमक्या कोणत्या सावकारांची नावं आहेत, हेदेखील पोलिसांनी उघड केलेलं नाही.

1 कोटी कर्जाची परतफेड करूनही खासगी सावकारांना त्रास संपत नाहीये, अशा आशयाची तक्रार नांदेडकर यांनी चिठ्ठीत केल्याचं म्हटलं जातं. ही चिठ्ठी अद्याप उघड करण्यात आलेली नाही.

नांदेड हे पूर्वी शिवाजीनगर, नक्षत्रवाडी या भागात राहात होते. काही महिन्यांपूर्वीच ते सातारा परिसरात वास्तव्यास आले.

नांदेडकर यांनी काही वर्षे इलेक्ट्रिक ठेकेदार म्हणून काम केलं. 2018 पासून ते खासगी सावकारांकडून व्याजावर कर्ज घेऊन बांधकाम व्यवसाय करत होते.