Devendra Fadnavis : भाजपाची आतापासूनच पोस्टरबाजी; पुण्यानंतर औरंगाबादेतला ‘हा’ भला मोठा फ्लेक्स आता वेधून घेतोय सर्वांचं लक्ष

| Updated on: Jun 24, 2022 | 12:05 PM

सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून सत्तास्थापनेसाठीची रणनीती आखली जात आहे.

Devendra Fadnavis : भाजपाची आतापासूनच पोस्टरबाजी; पुण्यानंतर औरंगाबादेतला हा भला मोठा फ्लेक्स आता वेधून घेतोय सर्वांचं लक्ष
औरंगाबादेत लावण्यात आलेले देवेंद्र फडणवीसांचे पोस्टर
Image Credit source: sakal
Follow us on

औरंगाबाद : भाजपाला मुखमंत्रीपदाचे वेध लागले असून आता पोस्टरबाजीदेखील (Poster) सुरू झाली आहे.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. तेव्हा पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एक पोस्टर पाहायला मिळाले होते. त्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत, अशा आशयाचा मजकूर होता. आता अशाच प्रकारचे एक पोस्टर औरंगाबाद तालुक्यातही पाहायला मिळत आहे. जालना महामार्गावरील (Jalna Road) केंब्रिज चौकात एक भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहे. हे भले मोठे पोस्टर वाहनधारकांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. विठुरायाला साकडे यानिमित्ताने घालण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अजून ठरायचे बाकी असतानाच अशी फ्लेक्सबाजी भाजपाकडून सुरू झाली आहे.

सत्तास्थापनेसाठी रणनीती?

सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून सत्तास्थापनेसाठीची रणनीती आखली जात आहे. मागील दोन दिवसांपासून औरंगाबाद तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याच प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत. सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या चर्चा रंगत आहेत. तर गुरुवारी (दि. 23) वरूड येथील भाजपाचे युवा नेते तथा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर दांडगे यांनी एक पोस्टर जालना रोडवर लावले. विठू माऊलीस आर्जव करून आषाढी एकादशीस पंढरपुरातील पांडुरंगाची पूजा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावी, यासाठी साकडे घालण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हटले आहे पोस्टरमध्ये?

‘हे विठू माऊली, तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. तुझ्या पंढरपूरच्या पुजेला मुख्यमंत्री देवेंद्रजी येवू दे’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, संभाजीनगर (औरंगाबाद)तर्फे हे पोस्टर लावण्यात आले आहे. शेखर दांडगे पाटील यांनी या पोस्टरच्या माध्यमातून विठुरायाला साकडे घातले आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे पोस्टर पुण्यातील शिवाजीनगर परिसरातदेखील पाहायला मिळाले.