जिल्हा शल्य चिकित्सकाचा थाटात निरोप समारंभ, कोरोना नियमांना हरताळ, औरंगाबाद प्रशासन कारवाई करणार ?

औरंगबाद शहरामध्ये विकेंड लॉकडाऊन असूनही एका जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय.

जिल्हा शल्य चिकित्सकाचा थाटात निरोप समारंभ, कोरोना नियमांना हरताळ, औरंगाबाद प्रशासन कारवाई करणार ?
कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले.

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तर तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर ठिकाणी कोरोनाचा फैलाव रोखण्यात अजूनही यश आलेले नाही. काही ठिकाणी तर कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. याच कारणामुळे राज्यात अजूनही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. नियमांचे पालन करण्याचे आवाहान सरकारकडून केले जात आहे. मात्र, काही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद शहरामध्ये विकेंड लॉकडाऊन असूनही जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यावेळी येथे कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले असून या कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. (Corona rules broken in Farewell ceremony of Aurangabad District Surgeon)

कार्यक्रमाला सहकारी, मित्र तसेच नातेवाईकांची हजेरी

औरंगाबाद शहरातील जिल्हा शल्य चिकित्सकांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हॉटेल शिवशाहीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. औरंगाबाद शहरामध्ये सध्या विकेंड लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यावर बंधने आहेत. मात्र, असे असतानादेखील निरोप समारंभाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेवा समाप्त झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकाचे अनेक सहकारी, मित्र तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमात कोरोना नियमांना हरताळ

या निरोप समारंभात जिल्हा शल्य चिकित्सकाच्या संपर्कातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमात आलेल्या अनेक महिला आणि पुरुषांनी चेहऱ्याला मास्क लावलेले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा पुर्णपणे फज्जा उडाला होता. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना पुष्पगुच्छ देण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती. विशेष म्हणजे ज्या जिल्हा शल्य चिकित्सकांचा निरोप समारंभ होता, खुद्द त्यांनीसुद्धा चेहऱ्याला मास्क लावलेले नव्हते.

प्रशासन कारवाई करणार का ?

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोना नियमांचे अशा प्रकारे उल्लंघन केले जात असेल तर आगामी काळात औरंगाबाद शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, असे मत येथील नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या या पवित्र्यानंतर शिवशाही हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या आयोजकांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट डेंजर, एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख रुग्णवाढीचा अंदाज

पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक, 1 दिवसाची पोलीस कोठडी

भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, शिवसेना नेते राजेंद्र जंजाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

(Corona rules broken in Farewell ceremony of Aurangabad District Surgeon)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI