Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!

| Updated on: Dec 06, 2021 | 7:00 AM

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या निधनानांतर या महामानवाच्या अस्थी काही निवडक विश्वासू कार्यकर्त्यांकडे देण्यात आल्या. त्यात मराठवाड्यातील भाऊसाहेब मोरे यांच्याकडे काही अस्थी देण्यात आल्या. महामानवाचा हा ऊर्जादायी ठेवा मोरे कुटुंबियांनी आजही जपून ठेवलाय.

Dr. Ambedkar: महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात फक्त एकाच ठिकाणी, औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे लाखमोलाचा वारसा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी औरंगाबादमधील मोरे कुटुंबियांकडे सुरक्षित
Follow us on

औरंगाबादः समाजाला समृद्ध करणाऱ्या, समाजाचा उद्धार करणाऱ्या महान व्यक्तींच्या पश्तात त्यांच्या प्रत्येक आठवणी, त्यांनी वापरलेल्या वस्तू समाजासाठी मौल्यवान ठेवा असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) हे तर अवघ्या जगाचे प्रेरणास्थान. दलितांच्या उद्धारासाठी स्वतःचे जीवन अर्पण करणाऱ्या या महामानवाचा सहवास, सान्निध्य, मार्गदर्शन, मैत्र लाभलेल्या व्यक्तीही तितक्याच नशीबवान म्हणता येतील. यापैकीच एक म्हणजे औरंगाबादचे  भाऊसाहेब मोरे (Bhausaheb More)! भाऊसाहेब मोरे आणि बाबासाहेबांचे सख्य एवढे होते की, डॉ. बाबासाहेबांच्या निधनानंतर काही मोजक्याच जणांना त्यांच्या अस्थी जपून ठेवण्यासाठी देण्यात आल्या. मराठवाड्यातल्या मोरे यांना हे भाग्य लाभलं. भाऊसाहेब मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्रांनी हा वारसा आजपर्यंत प्राणपणानं जपलाय. बाबासाहेबांच्या जयंतीला तो अनुयायांच्या दर्शनाकरिता खुला केला जातो.

डॉ. बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू भाऊसाहेब मोरे

मूळचे कन्नडचे असलेले भाऊसाहेब मोरे यांनी पुण्यात बीए ची पदवी घेतली. मराठवाड्यातील ते पहिले दलित पदवीधर. 1935 मध्ये त्यांनी येवल्यात बाबासाहेबांनी जाहिर सभा ऐकली. त्यांना मराठवाड्यात येण्याचे निमंत्रण दिले. 1938 मध्ये कन्नडा तालुक्यातील मक्रणपूर येथे बाबासाहेबांची सभा झाली. याच सभेत भाऊसाहेबांनी जगाला जय भीमचा नारा दिला. त्यानंतर भाऊसाहेब मोरे यांना उच्चशिक्षित दलितांची आघाडी ऑल इंडिया वर्किंग कमिटीचे सदस्यपद मिळाले. 1942 मध्ये त्यांना निझामाच्या राजवटीत प्रपोगंडा लेव्ही ऑफिसर या गॅझेटेड पदावरील क्लास 1 ची नोकरी मिळाली. त्यांच्याकडे चार जिल्ह्याची जबाबदारी होती. परंतु बाबासाहेबांमुळे प्रभावित होऊन त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर अखेरपर्यंत ते बाबासाहेबांसोबत समाजकार्यात सक्रीय राहिले.

1936- महार मांग परिषद मुंबई. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला डावीकडून भाऊसाहेब मोरे, पीआर व्यंकटस्वामी, आदी नेते.

अस्थींचा ठेवा मोरे कुटुंबियांपर्यंत पोहोचला!

6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत निधन झाले. 9 तारखेला अहमदनगरमध्ये स्टेट शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक शोकसभा घेण्यात आली. यास सर्व पदाधिकारी आणि बाबासाहेबांचे प्रमुख अनुयायी उपस्थित होते. आम्ही दलित समाजात एकसंघ ठेऊ, त्यास विभक्त नाही होऊ देणार, फूट नाही पडू देणार, बाबासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहू, अशी शपथ सर्वांनी घेतली. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रेसीडीयम नेमण्यात आले. कापडात गुंडाळलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी फेडरेशनच्या सर्व प्रांताध्यक्षांना सुपूर्द करण्यात आल्या. यात मराठवाड्याचे प्रांताध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नाशिकचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, मुंबई प्रांताचे अध्यक्ष बी.सी.कांबळे, अहमदनगरचे अध्यक्ष दादासाहेब रोहम, नगापूर-चंद्रपूर-भंडाराचे बॅ.खोब्रागडे, पुण्याचे पी.एन.राजभोज आणि साताऱ्याचे प्रांताध्यक्ष आर.डी.भांगरे, बी.पी.मौर्य यांना या अस्थी सोपवण्यात आला. सर्वांनीच या अस्थी जीवापाड जपल्या आहेत.

अस्थींमध्ये बाबासाहेबांचे दात आणि हाडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणि दोन दातांचा ठेवा

भाऊसाहेबांकडील अस्थिंमध्ये बाबासाहेबांचे दोन दात आणि हाडांचा समावेश आहे. 1996 मध्ये भाऊसाहेबांच्या निधनांतर त्यांचे पुत्र जगदिश मोरे आणि प्रविण मोरे हे अस्थींची विशेष काळजी घेतात. या अस्थींची जपणूक करण्यासाठी काचेची पेटी तयार करण्यात आली आहे. प्रविण मोरे हे डीवायएसपी पदावर कार्यरत आहेत तर जगदीश मोरे हे एसटी महामंडळाचे निवृत्त कर्मचारी. दरवर्षी 14 एप्रिल या बाबासाहेबांच्या जन्मदिनी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात बाबासाहेबांच्या या प्रेरणादायी अस्थी दर्शनासाठी ठेवल्या जातात. बाबासाहेब आणि भाऊसाहेब यांच्यादरम्यान झालेला पत्रव्यवहाराचा वारसाही मोरे कुटुंबियांनी प्राणपणाने जपलाय.

डॉ. आंबेडकरांच्या निधनानंतरच्या शोकसभेचे पत्रक मोरे कुटुंबियांनी जपून ठेवलेय.

हा ऊर्जादायी ठेवा संरक्षित होण्याची अपेक्षा

भाऊसाहेब मोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी बाबासाहेबांच्या अस्थी जीवापाड जपल्यात. मात्र आतापर्यंत अनेकजणांनी त्यांच्याकडे या अस्थींची मागणी केली आहे. त्याबदल्यात पैशांचीही ऑफर देण्यात आलीय. मात्र या मौल्यवान ठेव्याची सर पैशांनी कधीही येणार नाही, असे भाऊसाहेब मोरे यांचे पुत्र जगदिश मोरे म्हणतात. तर येत्या काही वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत एक वस्तुसंग्रहालय होणार आहे, ते प्रत्यक्षात आल्यानंतर महामानवाचा हा ऊर्जादायी ठेवा तिथेच समर्पित करण्याचा मानस प्रविण मोरे यांनी व्यक्त केला.

इतर बातम्या-

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!</h3>