भारीच! ग्रामपंचायतीनेच सुरु केलं स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय, औरंगाबादच्या कुंभेफळची देशात चर्चा

| Updated on: Oct 10, 2021 | 1:41 PM

रुग्णालयातील पुढील कामकाज तसेच स्टाफ, नर्स, डॉक्टरांचा पगारदेखील ग्रामपंचायतीद्वारेच केला जाणार आहे. मात्र रुग्णालयात येणाऱ्या महिला व बालकांवर अगदी निःशुल्क उपचार केले जातील.

भारीच! ग्रामपंचायतीनेच सुरु केलं स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय, औरंगाबादच्या कुंभेफळची देशात चर्चा
गावातील महिलांना आता उपचारासाठी गावाबाहेर न जाता मोफत उपचारांची सोय झाली आहे.
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या कुंभेफळ ग्रामपंचायतीने (Kumbhefal Gram Panchayat) आणखी एक स्तुत्य कामगिरी केली आहे. या ग्रामपंचायतीने स्वतःच्या ताकतीवर महिला व बालकांसाठी एक स्वतंत्र रुग्णालयच (Hospital for women and chilldren ) सुरु केलं आहे. सर्व सुविधायुक्त अशा या रुग्णालयामुळे येथील ग्रामस्थांना तसेच आजूबाजूच्या परिसरातील महिला व बाल रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. कोरोना काळात गावाच्या जवळ रुग्णालय असण्याची गरज अधिकच अधोरेखित झाल्याने ग्रामपंचायतीने आपल्या गावातच रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याचे मूर्त स्वरुप पहायला मिळत आहे.

20 बेडचं रुग्णालय, रुमही सुसज्ज

औरंगाबादहून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं कुंभेफळ हे गाव औरंगाबाद तालुक्यातच येतं. इथली लोकसंख्या जवळपास 5 हजार एवढी आहे. कुंभेफळ ग्रामपंचायतीनं उभारलेलं हे रुग्णालय म्हणजे गावातील महिला आणि बालकांसाठी मोठा आधार ठरणार आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर आणि काळजी घेणाऱ्या नर्सचीही व्यवस्था आहे. आता गावातील महिलांना उपचारांसाठी गावाबाहेर जाण्याची फार गरज पडणार नाही. विशेष म्हणजे एखादे बालक किंवा महिलेची प्रकृती अधिक गंभीर असेल आणि त्यांना रुग्णालयातच अॅडमिट करण्याची गरज असेल तर त्यासाठीची व्यवस्थाही या रुग्णालयात करण्यात आली आहे. येथे 20 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे स्पेशल रुमचीही सोय करण्यात आली आहे. गावातल्या अद्ययावत रुग्णालयातील रुम पाहिल्या तर आपण ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहोत, असे वाटणारही नाही.

उपचारासाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही

कुंभेफळ येथील अनेक महिलांना आतापर्यंत काही उपचारांसाठी थेट औरंगाबादचे रुग्णालय गाठावे लागत होते. मात्र आता गावातच महिला व बालरुग्णालय सुरु झाल्याने त्यांना येथेच उपचाराची सोय झाली आहे. जास्तीत जास्त महिला व बालकांनी या रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके यांनी केले आहे.

 

ग्रामपंचातीच्या निधीतून उभारणी

कुंभेफळ येथील या रुग्णालयाची उभारणी ग्रामपंचायतीच्या निधीतूनच करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील एमआयडीसी अंतर्गत येणाऱ्या विविध कंपन्यांच्या करातून रुग्णालयासाठी निधी जमा केला गेला. त्यातूनच गावातील महिला व बालकांसाठीचे हे अद्ययावत रुग्णालय आकाराला आले आहे. आता रुग्णालयातील पुढील कामकाज तसेच स्टाफ, नर्स, डॉक्टरांचा पगारदेखील ग्रामपंचायतीद्वारेच केला जाणार आहे. मात्र रुग्णालयात येणाऱ्या महिला व बालकांवर अगदी निःशुल्क उपचार केले जातील. कुंभेफळ ग्रामपंचायतीनं स्वबळावर उभारलेल्या या रुग्णालयाची चर्चा राज्यातच नव्हे तर देशात आहे. अशा प्रकारे ग्रामपंचायतीने स्वतःच्या ताकतीवर उभारलेले हे रुग्णालय सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी मनपाकडे व्हॅक्सिनेटर्सचा तुटवडा, सध्याची केंद्रसंख्या अपुरी

Aurangabad: बीएलओंना निवडणूक आयोगाच्या गरुड अ‍ॅपचे प्रशिक्षण, आता 3 हजार अधिकारी झाले स्मार्ट!