कुणबी प्रमाणपत्र रद्द… जरांगे पुन्हा भडकले, एका वाक्यात सरकारला इशारा; म्हणाले, एक ना एक दिवस…

समाजाने सावध असलं पाहिजे. आपलं कोण हे आणि परकं कोण हे पाहिलं पाहिजे. आपला माणूस असून आपली पिळवणूक करत असेल, वाटोळं करत असेल तर आपलं कोण? आंधळंप्रेम करण्यात अर्थ नाही. आपण आपला म्हणून मंत्र्याला निवडून येतो. पण आपलं काम न करता तो विरोधकांचं काम करत असतो, असं मनोज जरांगे म्हणाले.

कुणबी प्रमाणपत्र रद्द... जरांगे पुन्हा भडकले, एका वाक्यात सरकारला इशारा; म्हणाले, एक ना एक दिवस...
manoj jarange patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 1:06 PM

छत्रपती संभाजीनगरात नोंदी असूनही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला खरमरीत इशारा दिला आहे. कोर्टाने प्रमाणपत्र रद्द केले तरी आयुक्तांकडे सुनावणी होऊन ते प्रमाणपत्र बहाल होतील. त्यासाठी नवा जीआर काढला असून आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केलं आहे, असं तुम्हीच म्हटलं होतं. आता विभागीय आयुक्त तुमचा, प्रशासन तुमचं, सरकार तुमचं, जीआर तुमचा, तरीही प्रमाणपत्र रद्द होत आहेत. तुम्ही समाजाला मोठं होऊ देत नाहीये. त्यांना समाजाची झालेली एकजूट सहन होत नाहीये. ही एकजूट तोडायची आहे, असा दावा करतानाच आम्ही तुम्हाला हिसका दाखवणार आहोत. एक ना एक दिवस सरकार बदलल्यावर प्रमाणपत्र मिळणारच आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सरकारला इशारा दिला. प्रमाणपत्र रद्द होण्याच्या दोन महिने आधीच मी मंत्र्यांना त्याची कल्पना दिली होती. उदय सामंत यांनाही सांगितलं होतं. चंद्रशेखर बावनकुळेंबाबत मी राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनाही सांगितलं होतं. काय घडतंय त्याची माहिती दिली होती. त्यांना चुकीचं पाऊल उचलू नका, असं म्हटलं होतं. गोरगरीबांचं वाटोळं करू नका. तुमचा माझ्याबद्दल द्वेष असेल, मी समाज सोडून तुमचं ऐकत नाही म्हणून माझा राग असेल तर तो माझ्यावर काढा. पण गोरगरीबांच्या मुलांवर राग काढू नका. ते पाप, ती हाय तुम्हाला लावून घेऊ नका, असं सांगितलं होतं. तरीही प्रमाणपत्र रद्द झाले, असं मनोज जरांगे म्हणाले.

Loading...

आनंदाची बातमी कशी असेल?

त्यानंतर एक दोन दिवसाने मंगेश चिवटे आणि उदय सामंत यांचा मला फोन आला होता. आम्ही नवीन जीआर काढला. सर्व क्लिअर होईल, असं चिवटे म्हणाले होते. प्रकरण आयुक्तांकडे वर्ग करण्यात आलं आहे. नव्याने प्रक्रिया सुरू करत आहोत. ही खूप आनंदाची बातमी आहे, असं चिवटे आणि सामंत यांनी सांगितलं होतं. आयुक्तांकडे अपील केलं तर प्रमाणपत्र मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यावर प्रमाणपत्र वैध करण्यासाठी की अवैध करण्यासाठी जीआर काढला? असा सवाल मी केला. जेव्हा आयुक्त सुनावणी घेतील आणि प्रमाणपत्र वैध ठरवतील तेव्हाच आनंदाची बातमी ठरेल. कुणबींचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जीआर काढला असेल तर चिवटे साहेब ही आनंदाची बातमी कशी असेल? असं मी चिवटेंना म्हटलं होतं. त्यांना ते पटलं होतं, असं जरांगे यांनी सांगितलं.

तळतळाट लागेल

माझं एकच म्हणणं आहे. तुम्हाला माझा काय द्वेष असेल, राग असेल तर माझ्यावर काढा. पण माझ्या गोरगरीबांचे प्रमाणपत्र रद्द करून बदला नका घेऊ. काल भोकरदनमधील एका मुलीचं प्रमाणपत्र रद्द केलं. तिचा तळतळाट लागेल. तुम्ही प्रमाणपत्र रद्द करत आहात. आम्ही कारण विचारत आहोत. भावाला प्रमाणपत्र दिलं, चुलत्याला दिलं, पुतण्याला का नाही? कारण द्या, असंही ते म्हणाले.

माझ्याबद्दल द्वेष असू शकतो

मराठा समाजात रोष वाढत आहे. त्याचा सरकारला फाटका असेल. मराठा समाज गरीब असेल, पण त्याला ज्ञान आहे. जो शेतात काम करून पीक वाढवतो. एका दाण्याचे शंभर दाणे करतो. देशातील लोकांचं पोट भरतो. त्याला ज्ञान असल्याशिवाय तो पीक काढणार नाही. त्याला ज्ञान आहे. म्हणून तुम्हाला निवडून दिलं आहे. त्याला तुम्ही देशोधडीला लावत आहात. जेवढे प्रमाणपत्र रद्द करतील, नोंदी असून प्रमाणपत्र देणार नाही तितका रोष वाढेल. माझ्याबद्दल रोष असू शकतो. पण गरीबांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.

मराठे बदला घेणारच

आज तुम्ही प्रमाणपत्र रद्द केलं. तुम्ही खूनशी सरकार आहात. एक ना एक दिवस सत्ता बदलल्यावर त्या नोंदी मराठा समाजाच्या कामालाच येणार आहेतय. कारण या नोंदी ओरिजनल आहेत. त्यामुळे मराठ्यांनी घाबरू नये. फक्त एकजूट ठेवली पाहिजे. वेळेला हिसका दाखवला जाणार आहे. तुम्ही आमचा बदला घेता. मराठे तुमचा बदला घेणारच, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us