ओबीसीचा मुद्दा काढला की षडयंत्रकारी मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात, पंकजांचा निशाणा नेमका कुणावर?

| Updated on: Oct 12, 2021 | 5:33 PM

औरंगाबाद येथे विभागीय ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. (pankaja munde address obc melava at aurangabad)

ओबीसीचा मुद्दा काढला की षडयंत्रकारी मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात, पंकजांचा निशाणा नेमका कुणावर?
Pankaja Munde
Follow us on

औरंगाबाद: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा काढला तर काही षडयंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात, अशा शब्दात ओबीसी आरक्षणात खो घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी कुणाचेही नाव न घेता हा हल्ला चढवला. त्यामुळे त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला याची जोरदार चर्चा रंगली आहे.

औरंगाबाद येथे विभागीय ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आता एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. इकडे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न कुणी तरी उचलला की तिकडे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसणाचं काम तुम्हीचं केलं, असा घणाघाती हल्ला चढवतानाच ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही काढत होतात त्यांनीच मराठा समाजला आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने ते आरक्षणही संपुष्टात आणलं, अशी जोरदार पंकजा यांनी केली.

जातीवाद पूर्वीही होता, आताही आहे

मी आधीच उपाशी आणि त्यात उपवास, बहुजनांची अवस्थाही अशीच आहे. गोपीनाथ मुंडे म्हणायचे ज्याला जातीची आणि मातीची लाज वाटते त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना जातीची आणि मातीची लाज वाटते आशा लोकांना राजकारणात उभं राहण्याची आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. जातीवाद पूर्वीही होता, जातीवाद आताही आहे. गावामध्ये गेल्यावर जातीवादाच्या भिंती अजूनही दिसतात. संतांच्या महाराष्ट्रात आज ओबीसींची अशी अवस्था का? असा सवालही त्यांनी केलाय.

निवडून येईल, पण संधी मिळेल काय?

या आरक्षणाचं भवितव्य काय आहे? या निवडणुकीत ओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्याचं काम सुरू केलं आहे. एखादा व्यक्ती ओपनच्या जागेवर निवडून येईल. पण त्याला मोक्याच्या ठिकाणी संधी मिळणार आहे का? आमची राजकीय आरक्षणाची मागणी नाही. तर शिक्षण आणि नोकऱ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे. पण आता आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षणासह राजकीय आरक्षणही मागणारच आहोत, असं त्यांनी सांगितलं.

मोदींनी सवर्णांनाही आरक्षण दिलं

मोदींनी दहा टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही त्या सवर्णांनाही आरक्षण दिलं. देशातील 22 राज्यात आपली सत्ता आहे. या राज्यांनी निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. मी मंत्री असताना माझ्याकडे या गोष्टी येत होत्या. त्यावेळी ओबीसींचं 50 टक्क्यांवरचं आरक्षण धोक्यात आलं होतं. हे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचंही आरक्षण संपुष्टात आलं. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांमध्ये संताप आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. भाजपच नाही तर ओबीसीही रस्त्यावर उतरला आहे. निवडणुका आहेत म्हणून अध्यादेश काढला. तोच आधी काढला असता तर. ज्या निवडणुका झाल्या त्यातही ओबीसींना फायदा झाला असता ना, असं त्या म्हणाल्या.

42 वर्षापासून संघर्ष सुरूच

वंचित आणि पीडीतांना लाभ मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. त्यामुळे अनेक मंत्री झाले. सरकार आलं आणि गेलं पण समाजाला न्याय मिळत नाही. माझं वय 42 वर्ष आहे. 42 वर्ष झालं तरी माझा संघर्ष सुरू आहे, असं सांगतानाच ओबीसींना आरक्षण द्या. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू नका, नाहीतर तुम्हाला बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं. तुम्ही जो ओबीसींसाठीचा अध्यादेश काढला आहे. तो टिकवून दाखवा. तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवला तर आम्ही तुमचं कौतुकच करू, असंही त्या म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

संबंधित बातम्या:

..तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, पंकजा मुंडेंचं आव्हान, टार्गेटवर ठाकरे सरकार

पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यावरुन पुन्हा संभ्रम; अजितदादांकडून आजची तारीख, तर सामंत म्हणतात, आताच नाही!

कोळसा तुडवड्याला मोदी सरकारचं चुकीचं धोरण जबाबदार, बावनकुळेंच्या आरोपांवरुन मलिकांचा पलटवार

(pankaja munde address obc melava at aurangabad)