एक लाख रुपयांचा दंड भरून राज क्लॉथ सुरु, नियम मोडले तर दंड भरू, पण सील करू नका! औरंगाबादेत व्यापाऱ्यांची मागणी

| Updated on: Jan 18, 2022 | 10:25 AM

काल मंगळवारी कामगार उपायुक्त राऊत यांनी सुनावणी घेतली. दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने दुकानाला 1 लाख रुपये दंड भरावा लागला. त्यानंतर दुकानाचे कुलूप काढण्यात आले.

एक लाख रुपयांचा दंड भरून राज क्लॉथ सुरु, नियम मोडले तर दंड भरू, पण सील करू नका! औरंगाबादेत व्यापाऱ्यांची मागणी
औरंगाबादेत व्यापाऱ्यांची बैठक
Follow us on

औरंगाबादः जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाने आखून दिलेले कोरोनाचे नियम भंग झाल्यास दंड लावा, पण दुकान सील करून नका अशी विनंती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने केली आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण (Sunil Chavan) यांच्यासमोर व्यापाऱ्यांनी ही विनंती केली. शहरातील प्रसिद्ध राज क्लॉथ सेंटरच्या जालना रोडवरील दुकानाचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी त्यांना 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. तो भरल्यानंतरच कुलूप उघडण्यात आले.

ऐन संक्रांतीला दुकानाला टाळे!

जालना रोडवरील राज क्लॉथ सेंटरमधील सफाई कर्मचाऱ्याने लस घेतली नाही, असे कारण दाखवत 13 जानेवारीला मनपाच्या पथकाने राज क्लॉथ सेंटरला कुलूप लावले होते. ऐन संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही कारवाई झाल्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी पसरली. आधीच कोरोनामुळे व्यवसाय मोडकळीस आले आहेत. त्यात संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दुकान बंद करणे म्हणजे पोटावर पाय असल्याचे त्यांचे म्हणणे होते. राज क्लॉथचे मालक अनिल केलानी यांनी प्रशासनाची माफी मागितली तरीही कुलूप उघडले नाही. काल मंगळवारी कामगार उपायुक्त राऊत यांनी सुनावणी घेतली. दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने दुकानाला 1 लाख रुपये दंड भरावा लागला. त्यानंतर दुकानाचे कुलूप काढण्यात आले.

शहरातील व्यापाऱ्यांची बैठक

दरम्यान, मंगळवारी टिळकपथ येथील राधिका सेंटरमध्ये व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल, कापड असोसिएशनचे अध्यक्ष विनोद लोया, पैठणगेट टिळकपथ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष युसूफ मुकाती यांच्या नेतृत्वात बैठक झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. दुकानांनी नियम मोडल्यास त्यांना दंड आकारा, पण दुकान सुरु ठेवण्यास परवानगी द्या, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. प्रशासन हातगाड्यांकडे दुर्लक्ष करून मोठ्या दुकानदारांना टार्गेट करत असल्याचं मत व्यापाऱ्यांनी यावेळी मांडलं.

इतर बातम्या-

Pune Crime| राजगुरूनगर येथे बंद घरावर चोरट्यांचा डल्ला ; लांबवला इतक्या लाखांचा ऐवज

साखरपुड्यानंतरही गर्लफ्रेण्डशी संबंध, बापाकडून पोराची हत्या, बहीण-आईच्या मदतीने मृतदेह नदीत फेकला