काय सांगता? परवानगी नसतानाही संजय राऊतांच्या नेतृत्वात औरंगाबादला आक्रोश मोर्चा? पोलीस आयुक्तांचं मोठं विधान

औरंगाबादमधील शिवसेनेच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नव्हती, अशी माहिती समोर आली असून आता या प्रकरणी शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

काय सांगता? परवानगी नसतानाही संजय राऊतांच्या नेतृत्वात औरंगाबादला आक्रोश मोर्चा? पोलीस आयुक्तांचं मोठं विधान
औरंगाबादेत शिवसेनेचा मोर्चा विना परवानगी, गुन्हा दाखल होण्याची शक्यता
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 3:10 PM

औरंगाबादः शेकडो शिवसनेच्या कार्यकर्त्यांच्या जमावात आज औरंगाबादमध्ये (Aurangabad ShivSena) संजय राऊत (Sanjay Raut) आक्रोश मोर्चा काढला आहे. मात्र या मोर्चाला शहर पोलिसांची कोणतीही परवानगी नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police) ही माहिती दिली असून, या प्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई केली जाईल, असं वक्तव्यही औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर या मोर्चाप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आयोजकांवर कारवाई होणार का?

महागाईविरोधात शिवसेनेने काढलेल्या या मोर्चाची परवानगी शिवसेनेने घेतली नव्हती, आता पक्षातील नेमक्या कोणावर कारवाई होणार, असा प्रश्न विचारला असता, नेमक्या व्यक्तीचं नाव घेणं पोलिसांनीही टाळलं. मात्र मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई होणार, असंही सांगितलं.
तसेच मोर्चासाठी परवानगी नसेल तर एवढा फौजफाटा का तैनात करण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देताना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणं आवश्यक असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे शिवसेना मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई होणार का, याकडे सामान्य नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मोर्चा

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगबादमध्ये शिवसेनेच्या या मोर्चासाठी तयारी सुरु होती. आज 13 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातून सेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. महागाई विरोधातील सामान्य जनतेचा हा आक्रोश.. ही आक्रोशाची ठिणगी औरंगाबादेत पेटली असून तिचा वणवा दिल्लीपर्यंत पसरवणार, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. शहरातील क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा गुलमंडीपर्यंत गेला. तेथे संजय राऊत यांनी जाहीर भाषण करून मोर्चातील भूमिका स्पष्ट केली. या मोर्चात शेकडो शिवसैनिकांसह औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, मंत्री संदीपान भूमरे आदींचा सक्रिय सहभाग होता.

इतर बातम्या-

महागाईवरचं लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल