Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान

| Updated on: Sep 09, 2021 | 4:39 PM

संस्थान गणपतीची मूळ मूर्ती 2 बाय 2 फुटांच्या आकाराची आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची व काळ्या पाषाणातील आहे. उत्सवमूर्ती गेल्या 15 वर्षांपासून शाडूच्या मातीपासून तयार केली जाते.

Festival Special: औरंगाबादचं आराध्य दैवत संस्थान गणपतीची उत्सवमूर्ती तयार, मूर्तीकार बगले कुटुंबियांचा मान
संस्थान गणपतीच्या उत्सवमूर्तीवर अंतिम हात फिरवताना मूर्तीकार दिनेश बगले
Follow us on

औरंगबाद: शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती (Sansthan Ganpati, Aurangabad)येथील गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना करण्यात येणारी उत्सव मूर्ती जवळपास पूर्ण झाली आहे.औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी येथील मूर्तीकार दिनेश बगले (Dinesh Bagle) यांनी ही मूर्ती घडवली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहराचं आराध्य दैवत असलेल्या या गणेशाच्या उत्सवमूर्ती तयार करण्याचं काम बगले कुटुंबीय करतात. दिनेश बगले यांची ही तिसरी पिढी या कामी सेवा देत आहे.

उत्सवमूर्ती शाडूच्या मातीची

संस्थान गणपतीच्या मंदिरात गणोशोत्सवात बसवण्यात येणारी ही मूर्ती हुबेहुब मूळ संस्थान गणपतीच्या मूर्तीसारखी आहे. दिनेश बगले यांचे कै. आजोबा ताराचंद बगले यांच्यापासून संस्थान गणपतीसाठी मूर्ती देण्याचे कार्य सुरु झाले. त्यानंतर दिनेश यांचे वडील कै. रतनलाल बगले यांच्याकडे हा वारसा आला. रतनलाल बगले यांनी संस्थान गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच मूर्ती बनवण्याची परंपरा सुरु केली. दिनेश बगले यांच्याकडे हा वारसा वयाच्या 14 व्या वर्षापासून आला. तेव्हापासून आजपर्यंत संस्थान गणपतीची मूर्ती करण्याचा मान त्यांनाच दिला जातो. ही मूर्ती बगले कुटुंबियांकडून निःशुल्क दिली जाते. संस्थान गणपतीची मूळ मूर्ती 2 बाय 2 फुटांच्या आकाराची आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची व काळ्या पाषाणातील आहे. उत्सवमूर्ती गेल्या 15 वर्षांपासून शाडूच्या मातीपासून तयार केली जाते.

पीओपी विरुद्ध शाडूची माती

मूर्तीकार दिनेश बगले सांगतात, यंदा सार्वजनिक गणेश मंडळांना गणपती बसवण्याची परवानगी नसल्यामुळे फार मोठ्या मूर्ती तयार केलेल्या नाहीत. आम्ही पीओपी आणि शाडूच्या मातीच्या अशा दोन्ही प्रकारच्या मूर्ती तयार करतो. पर्यावरण पूरक गणेशोत्सव करण्याकडे लोकांचा कल असला तरीही शाडूच्या मातीचे गणपती फार कमी परवडतात. तसेच आम्हा मूर्तीकारांनाही त्या मूर्ती तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो. पीओपीच्या जिथं 50 मूर्ती तयार होतात, त्याच काळात शाडूच्या मातीच्या  दोनच मूर्ती तयार होतात. त्यामुळे आम्हालाही पीओपीच्या मूर्तीच तयार करणे जास्त परवडते.

नवसाला पावणाऱ्या संस्थान गणपतीचं महात्त्म्य

संस्थान गणपतीच्याच साक्षीने औरंगाबादेत गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शहरात एका खटल्यासाठी येत तेव्हाही ते या गणपतीसमोर डोकं टेकवल्याशिवाय कामाला सुरुवात करत नसत, असे जूने जाणकार सांगतो. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही महापालिकेचा हा गड शिवसेनेचाच होऊ दे, असा नवस या गणपतीच्या चरणी बोलला होता. तो पूर्णही झाल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी संपूर्ण शहरात वाजत-गाजत मिरवणूक काढत संस्थान गणपतीला सोन्याचा मुकूट स्वहस्ते अर्पण केला होता. तेव्हापासून शहरवासियांची या गणपतीवरील श्रद्धा अधिकच दृढ होत गेली. दरम्यान वर्षानुवर्षे मूर्तीवर शेंदूर लेपनामुळे तिचे मूळ रुप बदलून गेले होते. यंदा दीडशे वर्षानंतर ट्रस्टतर्फे वज्र पूजन करून शेंदुराचा थर काढण्यात आला. त्यानंतर संस्थान गणपतीची मूळरुपातील मूर्ती समोर आली आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: सोने-चांदी पुन्हा घसरले, सणासुदीत खरेदीची संधी, जाणून घ्या औरंगाबाद शहरातील भाव

Aurangabad | बैलाची शेतकऱ्याला जोरदार धडक, पोळ्याच्या दिवशी घटना