‘आम्ही गप्प याचा अर्थ हातात बांगड्या भरल्या नाहीत’, शिवसैनिकांनी सभा उधळल्यानंतर विनायक मेटे आक्रमक

| Updated on: Jun 24, 2021 | 5:18 PM

"ही सरकारची गुंडगिरी आहे. आम्ही सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या असा होत नाही", अशा शब्दात मेटे यांनी रोष व्यक्त केला (Vinayak Mete aggressive after Shiv Sena worker clash in Shivsangram meeting at Aurangabad).

आम्ही गप्प याचा अर्थ हातात बांगड्या भरल्या नाहीत, शिवसैनिकांनी सभा उधळल्यानंतर विनायक मेटे आक्रमक
विनायक मेटे, नेते, शिवसंग्राम
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला. शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे स्वत: या बैठकीत हजर होते. मात्र, काही शिवसैनिकांनी आरडाओरड, गोंधळ घातल ही बैठक बंद पाडली. अखेर या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं. या गदारोळानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. “शिवसंग्रामच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या गावगुंडांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या गावगुंडांना अटक नाही झाली तर परवाच्या मेळाव्यात आम्ही निर्णय घेऊ. ही सरकारची गुंडगिरी आहे. आम्ही सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या असा होत नाही”, अशा शब्दात मेटे यांनी रोष व्यक्त केला (Vinayak Mete aggressive after Shiv Sena worker clash in Shivsangram meeting at Aurangabad).

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद येथील पडेगाव येथे शिवसंग्रामची आज (24 जून) बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे हे देखील उपस्थित होते. शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, बैठक सुरु असताना अचानक तिथे काही शिवसैनिक दाखल झाले. त्यांनी प्रचंड गोंधळ घालत बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत शिवसैनिकांनी बैठकीत गोंधळ घातला. या गोंधळावरुन विनायक मेटे यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली (Vinayak Mete aggressive after Shiv Sena worker clash in Shivsangram meeting at Aurangabad).

‘ही सरकारी गुंडगिरी’

“मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्यावतीने आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही येत्या 26 जानेवारी रोजी मेळावा आयोजित केला आहे. यासाठी आम्ही पडेगाव येथे एका बैठकीचं आयोजन केलं होतं. मात्र या बैठकीत काही गावगुंडांनी येऊन गुंडगिरी सुरू केली. आमच्या बैठकीत मारामारी सुद्धा केली. ते गावगुंड सरकारी पक्षाचे होते. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते काम करत होते. पूर्वनियोजितपणे आमची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आमच्या शहराअध्यक्ष यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. ही सरकारी गुंडगिरी आहे”, असं विनायक मेटे म्हणाले.

‘मराठ्यांना घाबरवण्याची औकात कुणातही नाही’

“या राज्यातला मराठा समाज ना मुघलांना ना इंग्रजांना घाबरला. मराठ्यांना घाबरवण्याची औकात कुणातही नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पक्षात गुंड ठेऊन मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर मराठा समाज उसळी मारल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.

मेटे यांचा पोलिसांवरही आरोप

“बीडचा मोर्चा काढल्यानंतर पोलिसांचं वर्तन बदललं आहे. मला 25 वर्षे झालं संरक्षण आहे, पण मी मुंबईतून बाहेर पडलो की माझं संरक्षण काढून घेण्यात येत आहे. याबाबत मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे”, असं विनायक मेटे म्हणाले.

संबंधित बातमी : औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली