ऋषिकेश उद्धव ठाकरे… मतदाराला चक्क ठाकरेंचं आडनाव, निवडणूक आयोगाचा महागोंधळ; थेट…

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत मोठा गोंधळ समोर आला आहे. ऋषिकेश उद्धव सुरवसे या मतदाराचे नाव चक्क 'ऋषिकेश उद्धव ठाकरे' असे छापून आले. या भयंकर चुकीमुळे मतदाराचा हक्क हिरावला जाण्याची भीती असून, अनेक मतदारांच्या नावात बदल झाल्याने निवडणूक आयोगाने तात्काळ दुरुस्ती करून माफी मागावी, अशी मागणी ऋषिकेश यांनी केली आहे.

ऋषिकेश उद्धव ठाकरे... मतदाराला चक्क ठाकरेंचं आडनाव, निवडणूक आयोगाचा महागोंधळ; थेट...
Rishikesh Surwase
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2026 | 5:15 PM

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या यादीतील महागोंधळ समोर आला आहे. या मतदार यादीत एका मतदाराला चक्क उद्धव ठाकरे यांचं नाव, आडनाव देण्यात आलं आहे. उमेदवाराचं नाव ऋषिकेश उद्धव सुरवसे असं आहे. मात्र, मतदार यादीत त्याचं नाव ऋषिकेश उद्धव ठाकरे असं छापून आलं आहे. या गोंधळामुळे ऋषिकेशही चक्रावून गेला आहे. आता त्यांनी या महागोंधळामुळे निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या नावात तात्काळ दुरुस्ती करावी, नाही तर माझा मतदानाचा हक्क हिरावला जाईल, असं ऋषिकेश यांनी म्हटलं आहे.

बीड तालुक्यातील कुंभारी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुंभारीचे मतदार ऋषिकेश उद्धव सुरवसे यांच्या नावात चूक होऊन ते ऋषिकेश उद्धव ठाकरे झाले आहे. प्रारूप मतदार यादीत अनुक्रमांक 448 वरील मतदाराच्या नावात चूक झाल्यानंतर ऋषिकेश सुरवसे यांनी निवडणूक आयोगात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज सायंकाळी 7 वाजता ते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. प्रारूप यादी पुनर्नरीक्षण करून दुरुस्त करण्यात यावी, अनेकांच्या नावांमध्ये चुका आहेत, अशी मागणी ऋषिकेश सुरवसे यांनी केली आहे.

Loading...

चूक दुरुस्त करणार

पाच सहा दिवसापूर्वी मित्राने मला मतदार यादी पाठवली होती. त्यात थेट उद्धव ठाकरे यांचं नाव माझ्यासोबत जोडलं गेल्याचं दिसून आलं. त्याखाली एक मजकूर आहे. उलथापालथ करा, असा मजकूर त्यावर लिहिला होता. ते चुकीने झालं किंवा मुद्दाम केलं हे माहीत नाही. मी निवडणूक अधिकारी डोके यांच्याशी चर्चा केली. हा प्रकार नजर चुकीने झाल्याचं त्यांनी म्हटलंय. चूक दुरुस्त करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माझंच नाही तर मतदार यादीत अनेकांची नावे बदलली आहेत. माझ्या मित्रांचे मला फोन येत आहेत. त्यांच्याही नावामागे ठाकऱ्यांची नावे जोडल्या गेल्याचं ते सांगत आहेत, असं ऋषिकेश यानी सांगितलं.

माफी मागा…

पालवण येथे एका व्यक्तीचंही नाव ठाकरे झालं आहे. हे चुकीने झालंय की निवडणूक विभागाला खोडा घालायचा आहे हे सांगता येत नाही. आम्हाला आज संध्याकाळी 7 वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ दिला आहे, आम्ही सर्व त्यांना भेटणार आहोत. आम्ही विनंती करणार आहोत की, पुन्हा मतदार यादी तपासण्यात यावी किंवा मतदार यादीचा फेरविचार करावा. खूप कमी मतदार आहेत. आम्ही मतदानाला गेलो असतो तर उद्धव ठाकरेंना कुठून बोलावलं असतं? थेट आडनावातच बदल करण्यात आला आहे. आम्ही सुरवसे ते ठाकरे. एकच म्हणणं आहे, निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे. सर्व मतदारांची आयोगाने माफी मागितली पाहिजे. आमच्याकडून चूक झाली, असं करणार नाही, असं आयोगाने म्हटलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

अखेर नाव हटवले…

दरम्यान, नावाच्या घोळाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर निवडणूक आयोगाची एकच झोप उडाली. आयोगाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन बीड मराठवाडा पदवीधर मतदार यादीतील उद्धव ठाकरे हे नाव हटवले आहे. बीडचे निवडणूक अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी तशी माहिती दिली आहे. बीडच्या कुंभारी गावातील ऋषिकेश उद्धव सुरवसे यांच्या नावाऐवजी ऋषिकेश उद्धव ठाकरे असे झाले होते. ही त्रुटी प्रारूप यादीत झाली होती. मात्र अंतिम यादीत दुरुस्ती करून घेतली असून आता अशी कुठलीही दुरुस्ती बाकी राहिलेली नाही, अशी माहिती निवडणूक अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us