Tata Sons चा वाद सुरु असताना टाटा ट्रस्टच्या महत्वाच्या बैठकीत पाच मोठे निर्णय
टाटा सन्सच्या बैठकीपूर्वी टाटा ट्रस्टची बैठक पार पडली. यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून पाच प्रकल्पांसाठी १५० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली.

टाटा ट्रस्टची अलीकडेच एक मिटिंग झाली ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या मिटिंगमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्टने (SDTT) पाच प्रकल्पांच्या निधीला मंजुरी दिली. या पाच प्रकल्पांसाठी एकूण 150 कोटी रुपयांहून अधिक अनुदानास मंजुरी दिली आहे. यामध्ये पुण्यातील एका रुग्णालयही आहे. या रुग्णालयासाठी 50 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे नेतृत्व जहांगीर एच. सी. जहांगीर करत आहेत, जे यापूर्वी इतर टाटा ट्रस्टशी संबंधित राहिले आहेत.
नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग हे देखील उपस्थित होते. या मिटिंगमध्ये सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पण विशेष म्हणजे, टाटा समूहातील इतर ज्या विषयांची सध्या चर्चा सुरू आहे, त्याबाबत या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही.
एका सूत्रानुसार, सर रतन टाटा ट्रस्टचे (SRTT) विश्वस्त जहांगीर यांच्याशी संबंधित एका संस्थेला दिलेल्या अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित झाले. पण या प्रकरणात कोणाही वाद झाला नाही. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल हे ‘कवासजी जहांगीर ट्रस्ट’द्वारे चालवले जाते आणि जहांगीर एच. सी. जहांगीर हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून काम पाहतात.
रुग्णालयाचा 300 कोटी रुपयांचा विस्तार
गुरुवारी मुंबईतील टाटा ट्रस्ट्सच्या कार्यालयात आयोजित एसडीटीटी (SDTT) मिटिंगमध्ये रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने ३०० कोटी रुपयांच्या विस्तार योजनेबाबत सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, ३५० बेड्सची क्षमता असलेले हे अत्याधुनिक रुग्णालय एका नवीन इमारतीच्या बांधकामाद्वारे आपला विस्तार करत असून, या उपक्रमासाठी एसडीटीटी (SDTT) कडून सहकार्य दिले जात आहे.
रुग्णालयातील एक चतुर्थांश बेड्स सवलतीच्या दरात उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एसडीटीटी (SDTT) च्या विश्वस्तांना असे वाटते की, ज्या काळात अनेक आरोग्यसेवा पुरवठादार खाजगी इक्विटी कंपन्यांकडून निधी उभारणी करत आहेत, अशा वेळी स्वतःची संसाधने एकत्रित करणाऱ्या रुग्णालयाला आर्थिक पाठबळ देऊन प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
इतर कोणते प्रस्ताव मान्य?
बैठकीत चर्चा होऊन मंजूर करण्यात आलेल्या इतर प्रस्तावांमध्ये क्रीडा अकादमी, गरिबी निर्मूलन आणि मुलींना पाठिंबा देण्याशी संबंधित प्रस्तावांचा समावेश आहे. यातील अनेक प्रकल्प मागास भागात आहेत. उर्वरित प्रत्येक प्रस्तावासाठी सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाची एकूण रक्कम १५० ते २०० कोटी रुपयांच्या दरम्यान असेल.
