औरंगाबादेत घाटी रुग्णालयाची अचानक पाहणी, अस्वस्छता पाहून समिती संतापली, रुग्णांच्या नातेवाईकांनाही झापले

| Updated on: Oct 28, 2021 | 11:22 AM

समिती प्रमुखांनी घाटीती अस्वस्छता पाहून स्वच्छता निरीक्षकांना झापले असता त्यांनी कर्मचारी कमी असल्याचे सांगितले. त्यावर कमी कर्मचाऱ्यांत चांगले काम झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

औरंगाबादेत घाटी रुग्णालयाची अचानक पाहणी, अस्वस्छता पाहून समिती संतापली, रुग्णांच्या नातेवाईकांनाही झापले
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

औरंगाबादः महिला व बाल हक्क समितीने (Women and child rights committee ) बुधवारी अचानक औरंगबादमधील घाटी रुग्णालयाची (उपोूग पदेजगूोत) पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून समितीतील सदस्य चांगलेच भडकले. घाटीत इतकी अस्वच्छता कशी, असा सवाल समितीच्या प्रमुख तथा आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी घाटीच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे (Dr. Varsha Rote) यांना करत स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. गुरुवारी ही समिती ग्रामीण भागात पाहणी करणार असून शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या समितीत आमदार यामिनी जाधव, लता सोनवणे, सुमन पाटील, सुलभा खोडके, प्रतिभा धानोरकर, मंदा म्हात्रे, मोनिका राजळे, नमिता मुंदडा, गीता जैन, मंजुळा गावित, डॉ. मनीषा कायंदे, जयंत आसगावकर, नागोराव गाणार आहेत.

रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

घाटी रुग्णालयात गेल्यास सर्वत्र अस्वच्छता दिसून येते. यात रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक तंबाखू, गुटखा खाऊन जागोजागी भिंतीवर पिचकाऱ्या मारतात. हे चित्र महिला व बालकल्याण समितीने बुधवारी दुपारी भेट देऊन पाहणी केल्यानंतर पाहायला मिळाले. समितीने किचनची पाहणी केली. त्या वेळी भात चांगला नसल्याची त्यांनी सूचना केली. प्रसूती कक्षात जाऊन पाहणी केली असता एकाच बेडवर दोन महिला, खाली गादी टाकून झोपलेल्या महिलादेखील त्यांना दिसून आल्या. त्यावर त्यांनी कुठलाच आक्षेप घेतला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेत माहिती मागवून घेतली. समिती गुरुवारी ग्रामीण भागात जाऊन भेटी देणार आहे. महिला व बालकांचे हक्क व कल्याण समिती 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत येणाऱ्या योजना, प्रकल्प, कामे, केंद्र व राज्य शासन किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून आलेली तरतूद, निधी खर्च व कामांची सद्य:स्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांनाही झापले

दरम्यान, अहिरे यांनी अधिष्ठातांसोबत वॉर्ड क्रमांक 29, 30 आणि प्रसूती विभाग, किचनची पाहणी केली. या वेळी गुटख्याची स्थिती पाहून अहिरे यांनी घाटीत इतकी अस्वच्छता कशी होते, असे विचारले. त्यावर अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे म्हणाल्या, रुग्णांचे नातेवाईक आतमध्ये येताना तंबाखू-गुटखा सोबत घेऊन येतात, परंतु त्यांच्याकडून तंबाखू-गुटखा सुरक्षा रक्षक काढून घेतात. मात्र काही जण छुप्या पद्धतीने थुंकतातच. त्यानंतर अहिरे यांनी स्वच्छता निरीक्षकांना झापले असता त्यांनी कर्मचारी कमी असल्याचे सांगितले. त्यावर कमी कर्मचाऱ्यांत चांगले काम झाले पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. अहिरे यांना चहाचे कपदेखील पडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांनादेखील याबाबत विचारणा केली.

 केंद्रीय आयोगाच्या दौऱ्यात बदल

औरंगाबादमध्ये बुधवारी महिला व बालहक्क कल्याण समितीचे सदस्य दाखल झाले असतानाच  केंद्राच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष आले होते. त्यामुळे केंद्रीय आयोगाला माघार घेत त्यांच्या दौऱ्यात बदल करावा लागल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. अचानक झालेल्या बदलामुळे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी शहर व जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देत पुढील जिल्ह्याकडे प्रस्थान केले. व्यंकटेशन 26 ऑक्टोबर रोजी शहरात दाखल झाले. नियोजित कार्यक्रमानुसार ते 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता मनपा प्रशासकासोबत सफाई कामगारांच्या वसाहतीची पाहणी करणार होते. दुपारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांसोबत बैठक घेणार होते. परंतु, राज्याच्या विधिमंडळ महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीचाही दौरा २७ ऑक्टोबर रोजीच ठरला होता. त्यात बारा आमदारांचा समावेश होता. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी हजर राहणे प्रशासनातील अधिकाऱ्यांना जमणार नव्हते. त्यामुळे प्रशासनाने ऐनवेळी व्यंकटेशन यांना तशी कल्पना दिली. त्यामुळे व्यंकटेशन यांनी ऐनवेळी औरंगाबादेतील कार्यक्रम रद्द करून दिवसभर पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी उशिरा ते बीडकडे रवाना झाल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

इतर बातम्या-

Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार

औरंगाबादः साताऱ्यातील हेमाडपंथी खंडोबा मंदिराचे सर्वेक्षण, जीर्णोद्धाराचा डीपीआर लवकरच देणार