
Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू नेहमीच चर्चेत असतात. कधीकाळी महायुतीचा भाग असलेले बच्चू कडू आता मात्र सत्तेत नाहीत. सध्या त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचे वेगवेगळे प्रश्न हाती घेतले असून काही दिवसांपूर्वी त्यांनी उपोषणही केले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या या बेमुदत अन्नत्याग आंदोलनात केली होती. आता याच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्याला थेट धमकी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली जात आहे. विरोधकांसह बच्चू कडू यांनीदेखील या मुद्द्यावरून रान पेटवलं आहे. याच मागणीला घेऊन बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनही केले होते. त्यानंतर आता सक्तीने कर्जवसुली करणाऱ्या बँकेच्या मॅनेजरला बच्चू कडू यांनी थेट धमकी दिली आहे. कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथ येऊन ठोकतो, असं बच्चू कडू बँकेच्या मॅनेजरला म्हणाले आहेत.
फोन करून बच्चू कडू यांनी बँकेच्या मॅनेजरला तसा इशारा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना फोन करून आमच्याकडून सक्तीची कर्जवसुली केली जात आहे, अशी माहिती दिली होती. त्यानंतर बच्चू कडू यांनी हा कठोर पवित्रा घेतला आहे. तुम्ही कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या गावात येऊन दाखवा मग तुम्हाला सांगतो. तुम्ही जास्त हुशार झाले का? सरकार अजून कर्जमाफीबद्दल काही बोलत नाही. उद्या कर्ज माफ झालं तर तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे परत देणार का? असा प्रश्नांचा भडिमार बच्चू कडू यांनी बँकेच्या मॅनेजरवर केलाय.
तुम्ही जर सक्तीची वसुली केली तर मी सोडणार नाही. वाटत असेल तर मी तुम्हाला धमकी दिली, अशी पोलिसात तक्रार द्या. आता सक्तीची वसुली करायची. नाही केली तर ठोकल्याशिवाय राहणार नाही. आताच सांगतो, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी बँकेच्या मॅनेजरला दिलाय. आता बच्चू कडू यांच्या या धमकीनंतर बँक प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? तसेच शेतकऱ्यांकडून केली जाणारी सक्तीची कर्जवसुली थांबणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.