शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडूंनी बोलून दाखवली मोठी इच्छा, म्हणाले एकनाथ शिंदेंना…
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला असून, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार त्यांनी अमरावती येथील सभेत व्यक्त केला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी नुकतंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी (MLC) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी आपला अर्जही दाखल केला आहे. यानंतर एक भव्य जल्लोष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मोठे विधान केले.
पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही
अमरावतीच्या चांदूरबाजार येथे आयोजित भव्य जल्लोष सभेत बोलताना बच्चू कडू कमालीचे आक्रमक पाहायला मिळाले. यावेळी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रात्री २ वाजताही दरवाजा उघडा ठेवणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे. आजवर अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण मदतीसाठी धावून जाणारा असा मुख्यमंत्री प्रथमच पाहिला आहे. ज्यांनी माझ्या दिव्यांग बांधवांसाठी देशातलं पहिलं स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचं धाडस दाखवलं, त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले
यावेळी बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात शिंदे सरकारच्या कामाचा पाढा वाचला. देशातल्या अनेक राज्यांना जे जमलं नाही, ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं. हे करताना त्यांनी दिव्यांगाची जात किंवा धर्म पाहिला नाही, तर फक्त माणुसकी पाहिली. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्येही शिंदे साहेबांचा वाटा सर्वात मोठा होता. अशा कामाच्या माणसाला पुन्हा सत्तेवर बसवणं ही काळाची गरज आहे, असेही बच्चू कडूंनी म्हटले.
आम्ही हा भगवा खांद्यावर घेतला आहे तो केवळ सत्तेसाठी नाही तर तत्त्वासाठी आहे. आम्ही कोणत्याही ऐऱ्या-गैऱ्या नेत्याला स्वीकारलेलं नाही, तर जो नेता जनतेसाठी रस्त्यावर उतरतो अशा एकनाथ शिंदेंना स्वीकारलं आहे. मला जनतेने पाडलं म्हणून नेत्याने स्वीकारलं, असे विधान बच्चू कडूंनी केले.
राजकीय पुनर्वसन आणि भविष्यातील रणनीती
दरम्यान २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना पराभव झाला हाता. त्यानंतर आता बच्चू कडूंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाकडे राजकीय पुनर्वसन म्हणून पाहिले जात आहे. शिवसेनेत प्रवेश करताच मिळालेली विधान परिषदेची उमेदवारी आणि विदर्भातील त्यांची ताकद पाहता, आगामी काळात महायुतीला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच प्रहार जनशक्ती संघटना आता केवळ एक सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहील, तर राजकीय कार्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक आता पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाचे काम पाहतील, असे बच्चू कडूंनी स्पष्ट केले.