Bacchu Kadu: विधान परिषद मिळाली तर शिंदेंचा पाईक होईल… बच्चू कडूंना एकनाथ शिंदेंनी कोणती अट घातली?
Bacchu Kadu: विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अटी शर्ती सांगितल्या आहेत.

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, शिवसेनेने देखील काही अटी घातल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व मुद्यांवर भाष्य केले आहे. पदासाठी युती करणारा बच्चू कडू (Bacchu Kadu) नाही. मुद्यांसाठी युती करणारे आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. तसेच विधान परिषदेवर जायचं असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहितीही समोर आली होती.
कोणती अट घातली?
पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु…पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्वाचे आहेत. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही. 1 लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनाच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलनिकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे. पुढे ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझा मतदारांना आवडला नाही. गोतावळा होता, त्यात आम्ही हरलो.
बच्चू कडू यांनी या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीविषयी देखील बोलले. “मला प्रस्ताव माध्यमातून कळला. मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट झाली होती. पण या विषयावर चर्चा झाली नाही. विधान परिषदसाठी अर्ज भरायाला कागदपत्र बॅगेत असतात. पण चर्चा व्हायला हवी, मुद्दे आमचे महत्वाचे आहे” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले, प्रहारवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणाची ताकद नाही. आमची लायकी नाहीये का? 1 जागा मिळाली असती. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ. विलनीकरणाबाबत चर्चा तर झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघूया. किंतू-परंतू वर कशाला आत्ता बोलायचं. मी चेहऱ्यावरून आनंदी आहे. कारण नाव माझं कडू आहे, चेहरा कडू राहून कसं चालेल. एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांचा मजूराला, दिव्यांगना जर न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम अजून करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यावा, एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो.