
माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूरमध्ये हजारो शेतकऱ्यांसह ते आंदोलन करत आहेत. आज सायंकाळी न्यायालयाने बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळ सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर बच्चू कडू हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अटक करून घेण्यासाठी निघाले होते. त्यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी बच्चू कडू यांना भेटायला आले होते. यावेळी कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं आहे.
नागपूरचे कलेक्टर कडू यांनी भेटले त्यावेळी बच्चू कडू म्हणाले की, ‘तुम्हाला आज वेळ मिळाला का? आम्ही इतके दिवस झाले आंदोलन करत आहोत, आमची एकदा तरी भेट घ्यावी असं तुम्हाला वाटलं नाही का? यावर कलेक्टर म्हणाले मी तुमच्या संपर्कात होतो. यावर कडू म्हणाले की, तुम्ही कुठे संपर्कात होतात? आम्हाला मूर्ख बनवत आहात का? तुम्ही कलेक्टर आहात, कायदा सुव्य़वस्था राखणे तुमची जबाबदारी आहे.’
पुढे बोलताना कडू यांनी, ‘संपूर्ण आंदोलनादरम्यान तुमचा एकही फोन आला नाही. ही तुमची चांगली बाब नाही. तुम्ही स्वत:ला काय समजता? आम्ही इतके दिवस आंदोलनाला बसलो होतो, तुमचा एसपी भाजपचा झेंडा घेऊन फिरत आहे. तुम्ही भाजपच्या कार्यालयातून काम करा’ अशा शब्दात जिल्हाधिकाऱ्यांना झापले आहे. यावेळी मीडियाचे प्रतिनिधी, अनेक प्रमुख शेतकरी नेते आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
गृह (ग्रामीण) विभागाचे पंकज भोयार, तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या शिष्टमंडळाने बच्चू कडू तसेच इतर आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनस्थळी बच्चू कडू आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. त्यांनी केलेल्या मागण्याचा सरकार विचार करेल, असे या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. बच्चू कडू यांनी मात्र आम्ही कर्जमाफीवर ठाम असून ते आता उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यासाठी बच्चू कडू मुंबईत येणार आहेत.