सकाळी सकाळी उलट्या, उठून बसण्यासाठीही त्रास, बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली, कार्यकर्त्यांची चिंता वाढली

बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशी आहे. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली आहे. आज सकाळी त्यांना उलट्या झाल्या आहेत आणि त्यांना उठून बसण्यास त्रास होतो आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आज ऑनलाईन बैठक होणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यावरच ते आंदोलन मागे घेतील, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळी सकाळी उलट्या, उठून बसण्यासाठीही त्रास, बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली, कार्यकर्त्यांची चिंता वाढली
बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 12, 2025 | 12:32 PM

प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू आहे. या पाच दिवसात बच्चू कडू यांनी अन्नाचा कणही घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. आज सकाळीच त्यांना उलट्या झाल्या. त्यांना उठून बसण्यासाठीही त्रास होत आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. बच्चू कडू यांचे कार्यकर्ते उपोषणस्थळी येत आहेत.

बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आत पाचवा दिवस आहे. पाच दिवसात बच्चू कडू यांनी अन्नाचा कणही घेतला नसल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. बच्चू कडू यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे. सकाळी सकाळी त्यांना उलट्याही झाल्याने तब्येत आणखीनच खालावली आहे. पाच दिवसापासून पोटात अन्नाचा कणही नसल्याने त्यांचे वजन चार किलोने घटलं आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक

दरम्यान, बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत त्यांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज दुपारी ऑनलाईन बैठक होणार आहे. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित राहणार आहेत. या ऑनलाईन बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख केव्हा देणार? तारीख जाहीर झाल्यावरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट म्हटलंय. त्यामुळे या मुद्द्यावरच आजच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राजू शेट्टी भेटीला दाखल

दरम्यान, बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी अमरावतीत राज्यभरातून नेते येत आहेत. माजी मंत्री महादेव जानकर यांनीही बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे उपोषण स्थळी पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. तर, बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

बच्चू कडू यांच्या मागण्या

शेतमालाला MSP (किमान दर) वर 20% अनुदान द्यावे

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखाची आर्थिक मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या

दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 रुपये मानधन द्या

शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना द्या

धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करा

धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत 13 टक्के आरक्षण द्या