
मनसे आणि उद्धव ठाकरे गटाच्या संभाव्य युती संदर्भात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना आज पत्रकारांनी गाठलं. बाळा नांदगावकर यांनी नेहमीच दोन्ही ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याच समर्थन केलं आहे. “पक्ष प्रमुखांच्या अखत्यारितील विषय असल्यामुळे सद्य स्थितीत मी काही बोलण उचित वाटत नाही. माणसाने कुठेही, कधीही नकारात्मक विचार करु नये, या मताचा मी आहे. मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. निवडणुकीत पक्षाला, कार्यकर्त्यांना काय फायदा होईल, त्या दृष्टीने युतीचा विचार करावा लागतो. प्रत्येक पक्ष तसा विचार करतो” असं बाळा नांदगावकर म्हणाले.
तुम्ही उद्धव ठाकरेंकडे दोनदा युतीचा प्रस्ताव घेऊन गेला होता, आता तिसऱ्यांदा जाणार का? त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, “यावर काही बोलणं उचित आहे, असं मला वाटत नाही. विषय वरिष्ठ स्तरावरचा आहे. मी वरिष्ठ नाही, छोटा कार्यकर्ता आहे. छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठासारखं बोलू नये, असं मला वाटतं” संजय राऊत बोलले की, भूतकाळातले विषय सोडून, भविष्याबद्दल विचार केला पाहिजे, “माझी आणि संजय राऊतांची अजून चर्चा झालेली नाही, जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला उत्तर देईन” असं बाळा नांदगावकर म्हणाले.
विषय माझ्या अखत्यारित नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल, यावर नांदगावकर म्हणाले की, “मला माहित नाही ते. सध्या या विषयावर कुठलं भाष्य करणं योग्य वाटत नाही. तुम्ही कितीही खोलात गेलात, तरी माझ्याकडून उत्तर मिळणार नाही” “युतीचा विषय माझ्या अखत्यारित नाही. माझ्या हातात विषय येईल, तेव्हा मी किंवा राजसाहेब तुम्हाला सांगतील” असं उत्तर बाळा नांदगावकरांनी दिलं.
संजय राऊत यांच्याशी मी मित्र म्हणून कधीही बोलू शकतो
“वरिष्ठ पातळीवर काय चर्चा झाली, त्याची मला कल्पना नाही आणि असली तरी मी देणार नाही. जर-तरच्या गोष्टींवर बोलणं उचित नाही. संजय राऊत यांच्याशी मी मित्र म्हणून कधीही बोलू शकतो. पण पक्ष या विषयावर भाष्य करु शकत नाही” असं बाळा नांदगावकर म्हणाले.