मोठी बातमी! राज्यात आरक्षणाचा वणवा पेटणार, आता आणखी एक समाज रस्त्यावर, निघणार विराट मोर्चा

मराठा समाज आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आला आहे, मात्र त्यांनंतर आता मोठी बातमी समोर येत असून, राज्यात वातावरण तापण्याची शक्याता आहे.

मोठी बातमी! राज्यात आरक्षणाचा वणवा पेटणार, आता आणखी एक समाज रस्त्यावर, निघणार विराट मोर्चा
Updated on: Sep 08, 2025 | 4:11 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाला या आंदोलनाच्या माध्यमातून मोठं यश मिळालं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. सर्वात मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे, ओबीसी समाजाचा या जीआरला विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. या संदर्भात ओबीसी समाज आता कोर्टात देखील धाव घेण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यात आरक्षणावरून मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आला असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आता बंजारा समाज देखील एसटीतील आरक्षणासाठी एकवटला आहे.

बीड शहरात आज जिल्ह्यातील बंजारा समाजाची व्यापक बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीचा समावेश आहे. त्यासाठी आता  15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीड असा विराट मोर्चा समाजाच्या वतीनं काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते आम्ही बंद करू असा इशारा यावेळी बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. दरम्यान बाजारा समाजानं दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

एकीकडे राज्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर काढण्यात आल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे, तर दुसरीकडे आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी समाजाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.