पप्पी दे म्हणताच पप्पी देतो… बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील मुका घेणाऱ्या सोन्याला एक कोटीची मागणी

बारामतीच्या कृषी प्रदर्शनात सोनू आणि मोनू नावाच्या दोन बैलांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे बैल आज्ञाधारक असून, मालकाच्या सूचनांनुसार पाय जुळवतात, सरळ उभे राहतात आणि अगदी पप्पीही देतात! त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे एक कोटी रुपयांची ऑफर आली असली तरी मालक त्यांना विकण्यास तयार नाहीत.

पप्पी दे म्हणताच पप्पी देतो... बारामतीच्या कृषी प्रदर्शनातील मुका घेणाऱ्या सोन्याला एक कोटीची मागणी
Baramati Agri Show Ox Sonu and Monu jodi
| Updated on: Jan 18, 2025 | 1:06 PM

सरळ उभा राहा म्हटलं तर सरळ उभा राहतो… पाटावर उभा राहा म्हटल्यावर पाटावर उभा राहतो, एवढंच कशाला त्याला पप्पी दे म्हटलं तर थेट गालाचीच पप्पी घेतो… सोन्या आणि मोन्याच्या या करामतीवर सध्या सगळेच फिदा आहेत… त्याचं लोक तोंडभरून कौतुकही करत आहेत… अहं… दचकू नका. हा सोन्या मोन्या म्हणजे कोणी पोरं नाहीत. तर ही आहे बैलजोडी. यातील एकाचं नाव सोन्या. तर दुसऱ्याचं मोन्या. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात ही जोडी आलीय आणि त्यांच्या करामती पाहून शेतकरी हरखून गेलेत. यातील सोन्या बैलाला तर विकत घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. तब्बल एक कोटीत त्याला घ्यायला तयार आहेत.

बारामतीतील कृषी प्रदर्शनात कायमच काहीतरी वेगळेपणा पाहायला मिळतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने बारामतीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनात शेतीबरोबर पशू-प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये खिल्लार जातीच्या गाई, बैल, घोडे, विविध श्वान, मुऱ्हा जातीच्या म्हशी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी दाखल झाले आहेत. पण यातील मुख्य आकर्षण हे सोन्या आणि मोन्या हे बैल ठरताना दिसत आहेत.

काय आहे खास?

सोन्या आणि मोन्या हे दोन्हीही बैल खिल्लार जातीतील आहेत. बारामतीतील कृषी प्रदर्शनात असलेले हे बैल सर्वांचेच आकर्षण ठरत आहेत. हे सोन्या-मोन्या बैल विशेष आहेत. कारण हे सोन्या मोन्या बैल मुका घेणारे बैल आहेत. मालक जसं म्हणतो तसं सोन्या आणि मोन्या हे दोन्हीही बैल ऐकतात. या बैलांना तुम्ही जे बोलता ते सर्व समजते. तुम्ही त्यांना पप्पी घे असं सांगितलं तरीही ते ऐकतात आणि थेट गालावर पप्पी देतात.

आमचे सोन्या आणि मोन्या या दोन्हीही बैलांना आपण बोललेलं सर्व समजते. त्यांना तुम्ही पाय जुळवं म्हटलं तर पाय जुळवतात, सरळ उभं राहा म्हटलं तर सरळ उभं राहतात आणि पप्पी दे म्हटलं की पप्पी देतात, असे या सोन्या मोन्याचे मालक असलेले शेतकरी सांगतात.

आम्ही आमच्या मुलांप्रमाणेच वाढवलं

“सोन्या आणि मोन्या हे दोन्हीही बैल लहान साधारण ९ महिन्याचे असताना आम्ही पंढरपूर सांगोल्यावरुन आणले आहेत. आम्ही लहान असल्यापासूनच त्यांना एखाद्या मुलाला जसं वळण लावतो, तसं आम्ही त्याला वळण लावले. त्यांना आम्ही आमच्या मुलांप्रमाणेच वाढवलं. प्राण्यांचा जीव आणि आपला जीव एकच असतो. फक्त त्यांना बोलता येत नाही. फक्त त्यांच्या खाणाखुणा आपल्याला समजायला हव्या. तुम्ही त्याला जर पाय जुळवायला सांगितलं तर ते पाय जुळवणार, तुम्ही त्याला पप्पी घे म्हटलं की तो पप्पी घेणार. तुम्ही त्याला पाटावर उभा राहा म्हटलं की तो त्यावर उभा राहणार. आपण एखाद्या लहान मुलाला जसं वळण लावतो, तसंच आम्ही त्यांना केलं, असेही त्या शेतकऱ्याने म्हटले. सोन्या आणि मोन्या हे दोघेही फक्त मालकाची नव्हे तर इतरांचेही ऐकतात. या सोन्या आणि मोन्याने कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचीही पप्पी घेतली होती”, असेही त्या शेतकऱ्याने म्हटले.

“जोडीला विकणार नाही”

यामुळे या कृषी प्रदर्शनामध्ये येणारे शेतकरी या सोन्या मोन्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. मुका घेणारा सोन्याला तब्बल एक कोटीची मागणी आली आहे. मात्र मालकाने हा सोन्या मोन्या माझे जीव की प्राण आहेत, कसलीही वेळ आली तरी देखील मी या सोन्या आणि मोन्या या जोडीला विकणार नाही, असं या मालकाने सांगितले आहे.