बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
Sunil Tatkare : काँग्रेसने बारामती विधानसभा पोट निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने बारामती विधानसभेसाठी पोट निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच या ठिकाणी काँग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र आता काँग्रेसने बारामती विधानसभा पोट निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना उमेदवारी मागे घेतली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे म्हणाले की, ‘बारामतीत पोटनिवडणूक लागली आहे. काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज माघे घेतला. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. अजित पवार यांनी 1991 आणि 1992 साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. 1999 ते 2014 या काळात राज्यात लोकशाही आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री अशी पदे भूषविली आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. काँग्रेसने सामंजस्यपणा दाखवला आहे, बारामतीच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.’
आम्ही उमेदवारी मागे घेण्यासाठी खर्गेंशी संपर्क साधला होता
पुढे बोलताना तटकरे यांनी शरद पवार यांच्याबाबत बोलताना म्हटले की, साहेबांची भूमिका महत्वाची राहिली आहे. लोकशाहीत निवडूणक लढण्याचा अधिकार सर्वांना असा त्यांचा अर्थ होता. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला तशी पोटनिवडणूक नाशिकमध्ये झाली होती. हा मुद्दा आता राहिला नाही, मी आणि प्रफुल्ल भाईंनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंशी उमेदवारी मागे घेण्यासाठी संपर्क केला होता अशी माहितीही तटकरे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली होती. यावर बोलताना तटकरे यांनी म्हटले की, ‘आम्ही NDA मध्ये आहोत, आम्ही उघड भूमिका घेतलेली. त्यांचं ज्ञान राजकारणातील मोठे आहे. माझी देखील काही वर्ष काँग्रेसमध्ये गेली. आम्ही पण काम केलं आहे. आज त्यांचे आभार मानतो.