दीड हजार परत घ्या, मी 3 हजार देते, लाडक्या बहिणीचा संताप; दुष्काळ झळांमुळे अश्रूही अनावर!
Ashti Drought : विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धा पावसाळा संपत आला असतानाही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी महिलेने आपल्या व्यथा व्यक्त करत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

राज्याच्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. विशेषतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्धा पावसाळा संपत आला असतानाही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पिके करपून गेली आहेत. पिकांसोबतच पिण्याचे पाणी आणि मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. आष्टी तालुक्यातील महिला शेतकरी विमल शेळके यांनी या परिस्थितीबाबत संताप आणि हतबलता व्यक्त करत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. ‘जनावरांकडे पाहून डोळ्यात अश्रू येतात, घास जात नाही.’ अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
जनावरांसाठी फक्त दोन दिवसांचा चारा
विमल शेळके यांनी सांगितले की, ‘जनावरांसाठी आता फक्त दोन दिवसांचाच चारा उरला आहे. चारा नसल्याने मुकी जनावरे माना टाकून बसली आहेत. ही जनावरे कोणाकडे जाऊन चारा मागणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जनावरांची अवस्था पाहून मन हेलावून जाते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
किराणा भरायला तीन हजार रुपये पुरत नाहीत
महागाईच्या मुद्द्यावरही विमल शेळके यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. ‘महागाई गगनाला भिडली आहे. साखर 80 रुपये, गूळ 110 रुपये आणि शेंगदाणे 150 रुपये किलो झाले आहेत. लाडक्या भावांनी दीड हजार रुपये देऊन नादी लावलंय. किराणा भरायला तीन हजार रुपये पुरत नाहीत. तुमचे दीड हजार रुपये परत घ्या. मी 3 हजार देते लाडक्या बहिणींना किराणा भरून दाखवा’ असे संतप्त विधान त्यांनी केले. सरकारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपेक्षा सध्या शेतकऱ्यांना मूलभूत गरजा आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.
तातडीने दुष्काळ जाहीर करा
पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती पाहता आष्टी तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी विमल शेळके यांनी केली आहे. आमच्या डोळ्यातील हे अश्रू पाहून तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे. मुकी जनावरे उपाशी आहेत. ती कोणाला जाऊन मागणार? जनावरांकडे पाहून आमच्या डोळ्यात पाणी येते आणि आम्हाला घासही गिळवत नाही. सरकारने तातडीने जनावरांच्या चाऱ्याची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, पावसाने आणखी ओढ दिल्यास आष्टी तालुक्यातील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पाणी, चारा आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.