सख्ख्या भावाचा भयानक डाव, बुरख्याच्या आडून केलं असं काही… वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल

बीडमध्ये भावाने बहिणीची जमीन हडपण्यासाठी पत्नीला बुरखा घालून बहिणीच्या जागी उभे केले आणि बनावट कागदपत्रे तयार केली. न्यायालयाच्या आदेशानंतर आबेद खान आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.

सख्ख्या भावाचा भयानक डाव, बुरख्याच्या आडून केलं असं काही... वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल
beed (फोटो-प्रातिनिधिक)
| Updated on: Mar 30, 2026 | 11:40 AM

रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. स्वतःच्या सख्ख्या बहिणीची फसवणूक करण्यासाठी एका भावाने चक्क आपल्या पत्नीलाच बहिणीच्या रूपात उभे केले. त्याने बुरख्याचा आधार घेत नोंदणी कार्यालयात बनावट हक्कसोडपत्र तयार केले. त्यानंतर बहिणीच्या वाट्याची जमीन हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आता या पती-पत्नीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

रजिया बानो या बीड तालुक्यातील माळीपुरा येथील रहिवासी आहेत. त्यांनी नुकतंच याप्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. रजिया यांचे वडील आणि आईच्या निधनानंतर त्यांच्या मालकीची शेतजमीन सर्व वारसांमध्ये विभागली गेली होती. यानंतर ७/१२ उताऱ्यावर चार बहिणी आणि एक भाऊ अशा सर्वांची नावे कायदेशीररित्या नोंदवण्यात आली होती. नियमानुसार प्रत्येकाला आपल्या वाट्याचा हिस्सा मिळाला होता. मात्र आरोपी भाऊ आबेद खान याला संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर करायची होती. त्यासाठी त्याने २४ ऑक्टोबर २०२४ रोजी एक डाव रचला.

त्याने दुय्यम निबंधक कार्यालय (रजिस्ट्री ऑफिस), बीड येथे आपल्या पत्नीला, वाहिदा हिला सोबत नेले. वाहिदाने बुरखा परिधान केला होता. ज्यामुळे तिची ओळख पटवणे कठीण झाले. आबेदने निबंधक कार्यालयात आपली पत्नी हीच रजिया बानो ही बहीण असल्याचे भासवले. यानंतर बुरख्याच्या आड वाहिदाने रजिया यांच्या नावाच्या बनावट सह्या केल्या. यानंतर जमिनीचे हक्कसोडपत्र आबेदच्या नावे करून दिले.

न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कारवाई

हा सर्व फसवणुकीचा प्रकार रजिया बानो यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला पोलिसांत धाव घेतली. मात्र, तिथे योग्य दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अखेर न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणातील गांभीर्य आणि पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आबेद खान आणि त्याची पत्नी वाहिदा यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेमुळे बीड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पोलीस आता या प्रकरणातील साक्षीदार आणि निबंधक कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us