संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीत निषेध मोर्चा; धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आंदोलकांची मागणी

संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिने उलटली असतानाही न्याय मिळाला नाही. या निषेधार्थ बारामतीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात धनंजय देशमुख यांच्या कुटुंबीयांसह युगेंद्र पवार यांनी सहभाग घेतला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीत निषेध मोर्चा; धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आंदोलकांची मागणी
santosh deshmukh baramati morcha
| Updated on: Mar 09, 2025 | 11:57 AM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांच्या हत्येला आज तीन महिने उलटले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चाचे काढण्यात आला आहे. बारामतीतील कसबा चौक ते भिगवण चौकापर्यंत हा निषेध मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख सहभागी होणार आहे. त्यासोबतच या मोर्चात युगेंद्र पवार सहकुटुंब उपस्थित राहणार आहे.

धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, आंदोलकांची मागणी

धनंजय देशमुख यांचे कुटुंबिय मोर्चा स्थळी दाखल झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली. बारामतीतील मोर्चामध्ये पोलिसांकडून माध्यमांना कव्हरेज करण्यास विरोध करण्यात येणार आहे. पोलिसांकडून माध्यमांना हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.  बारामती पोलिसांकडून धनंजय देशमुख यांची मुलाखत घेण्यास नकार दिला जात आहे. बारामतीतील मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी बारामतीतील मोर्चातून आंदोलकांनी केली. या मोर्चाला युगेंद्र पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना सह आरोपी करा, अशी मागणी केली.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला तीन महिने का लागले?

बारामतीत संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चासाठी युगेंद्र पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना सहआरोपी करा. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मात्र त्याला तीन महिने का लागले? असा सवाल शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी केला. महाराष्ट्रात यापूर्वी अशा पद्धतीच्या घटना घडत नव्हत्या. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा सवाल उपस्थित झाला आहे. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे युगेंद्र पवार म्हणाले.