
संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, बीड : या जगात कधी काय होईल हे सांगता येत नाही. पृथ्वीवर याआधी असे काही चमत्कार झालेले आहेत, ज्यावर आजही विश्वास ठेवणं कठीण जातं. वैद्यकीय क्षेत्रात तर कधीकधी डॉक्टरांनाही अचंबित करून टाकणारे प्रकार घडतात. सध्या बीड जिह्यातही संपूर्ण महाराष्ट्राला चकित करणारी एक अजब घटना घडली आहे. येथे मृत्यू झालेलं नवजात बाळ अचानक जिवंत झालं आहे. विशेष म्हणजे कित्येक तास शवपेटीत ठेवूनही दफनविधीच्या वेळी लोकांना बाळाचं रडणं ऐकायला आलं आहे.
बीड जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका बाळाला मृत म्हणून घोषित केले होते. आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला होता. पण दफन करण्याच्या काही क्षण अगोदर ते बाळ रडायला लागल्याचे समोर आले आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील होळ येथील एका कुटुंबातील महिलेची 7 जुलै रोजी 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयात प्रसूती झाली होती. यावेळी नवजात बाळाचा मृत्यू झाला होता, असे सांगण्यात आले होते. डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून तसा निर्णय देऊन टाकला होता. डॉक्टरांनीच आपले बाळ मृत असल्याचे सांगितल्यानंतर नुकतेच प्रसूत झालेल्या महिलेने आणि तिच्या पतीनेही बाळ जिवंत असल्याची आशा सोडून दिली होती.
त्यानंतर या बाळाला दफन करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली. विशेष म्हणजे दफन करण्याआधीच अचानक बाळाच्या किंकाळ्या ऐकायला आल्या. बाळ दफन करण्याच्या काही मिनिटे अगोदरच बाळ जिवंत झाल्याचे समोर आले. नवजात बाळाच्या आजीने बाळाचा चेहरा बघण्याचा अट्टाहास केल्याने हा सगळा प्रकार समोर आला.
दरम्यान, विशेष म्हणजे हे नवजात बाळ 10 ते 12 तास शव पेटीत ठेवण्यात आलं होतं. तरी ते दफनविधीच्या अगोदर जिवंत झालं. ही बाब समोर येताच नवजात बाळाला तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर आता डॉक्टरांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. डॉक्टरांनी बाळाची नीट तपासणी केली होती का? असे विचारले जात असून याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
तर दुसरीकडे डॉक्टरांनी याबाबत रुग्णालयाची भूमिका स्पष्ट केली आहे. या संदर्भात पाच लोकांची समिती तयार करण्यात आली असून यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे रुग्णालयाने सांगितले आहे.