
आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली, या सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मघाशीच धनंजय मुंडे यांनी देखील सांगितलं. मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडलं, हे अंतर अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे पडलं. मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिला आहे, अशा शब्दात भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
राज्यात अतिवृष्टी झाली, महापूर झाला तरी तुम्ही इथे आला, ओबीसींची एकजूट दाखवली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद . दिवाळी आली, पण कशा शुभेच्छा देऊ? आमच्या १५ लोकांनी आत्महत्या केली आहे, आरक्षण गेलं म्हणून त्यांनी आत्महत्या केली. मग कशी दिवाळी साजरी करायची आहे? मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मघाशीच धनंजय मुंडे यांनी सांगितलं. मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडलं, हे अंतर अंतरवालीच्या दरिंदे पाटलांमुळे पडलं, असा घणाघात यावेळी भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाला वेगळ्या आरक्षणासाठी आम्ही पाठिंबा दिला. मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, जाट, गुर्जर यांचे मोर्चे निघाले. मोदींनी ईडब्ल्यूएस आणलं आणि सांगितलं काही घटक शिक्षणात, आर्थिकदृष्टीने मागे आहेत, पण सामाजिकदृष्टीने मागे नाहीत, त्यामुळे त्यांना रिझर्व्हेशनमध्ये जागा देता येत नाही. एका ईडब्ल्यूएसमध्ये १० पैकी ८ मराठा समाजाचे लोक निवडून आले, तरी म्हणतात मराठा समाजाला आरक्षण हवं, आम्ही म्हटलं द्या. आता म्हणतात ओबीसीतच पाहिजे, कोण म्हणतंय, ज्याचा अभ्यास नाही, असा टोलाही यावेळी भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला आहे.
आरक्षण सामाजिक दृष्टया मागास आहेत त्यांच्यासाठी आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा नारा नाही. ५४ टक्के ओबीसी ३७४ जाती, १३ टक्के दलित बांधव, ७ टक्के आदिवासी, ३ टक्के ब्राह्मण, त्यानंतर मुस्लिम आणि मग शिल्लक राहतात ते मोजा, तो मराठा समाज आहे. पण ६० टक्के आम्ही, ५० टक्के आम्ही, पाच कोटी मुंबईत आणणार, सरकारने नरमाईने घेतलं म्हणून दादागिरी दिसली, पोलिसांना सांगितलं असतं कामाला लावा, एक रात्र थांबायला पाहिजे होतं, पोलिसांनी रस्ता साफ केला होता, हे कोण होते? मराठा समाजाचे लोक नाही. हे दारूवाले, वाळूचोर हे त्याचे लोकं होते, दरिंदे पाटलाने आणलेले लोक, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.