
बीड. इतिहासातील अनेक मोठ्या घडामोडींचा थेट संबंध असलेला जिल्हा. भीर म्हणजे पाणी, त्याचा अपभ्रंश होऊन बीड झाले. दुष्काळाच्या छाताडावर माणुसकीची पेरण करणारा हा प्रदेश. अटकेपार झेंड रोवणाऱ्या मराठ्यांच्या मानाचे पान या जिल्ह्यातील योद्ध्यांनी कधीच भाळी लावले आहेत. वारकरी संप्रदायाची पाळमुळं रुजलेला जिल्हा. काबाडकष्ट करून अनेक चळवळींना बळ देणार्या या मातीला कोणी लावला बट्टा, कुणी केलं या मातीला बदनाम, पण आज का होतोय बदनाम? बीडची ‘राख’ रांगोळी करणारी कोणती ही गँग? केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या करताना सरपंचाला अनंत यातना देण्यात आल्या. तो विव्हळताना त्याचा असुरी आनंद घेणारी ही वृत्ती राज्यच नाही तर देशासमोर आली. माफियांचं राज्य लगेचच नकाशावर अधोरेखित झाले. बीडमधील खंडणी, दहशत, टोळ्यांचे राज्य समोर आले. पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणं एकामागून एक समोर येऊ लागली....