‘पोरगा सोडून द्या, मी बीड जिल्ह्याचा बाप..’; वाल्मिक कराड अन् महिला पोलीस अधिकाऱ्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, या ऑडिओ क्लिपनं खळबळ उडाली आहे.

पोरगा सोडून द्या, मी बीड जिल्ह्याचा बाप..;  वाल्मिक कराड अन् महिला पोलीस अधिकाऱ्याच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
walmik karad
| Updated on: Jan 28, 2025 | 3:19 PM

बीड जिल्ह्याच्या मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं असून, संतापाची लाट आहे. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी ठिक ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एकजण अजूनही फरार आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आता वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड फोनवर एका महिला पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहे, या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे.

नेमकी काय आहे ही व्हायरल ऑडिओ क्लिप? 

वाल्मिक कराड सायबर सेलच्या एका महिला अधिकाऱ्यासोबत बोलतानाची ही ऑडिओ क्लिप आहे. ही क्लिप व्हायरल असून, याबाबत टीव्ही 9 मराठी कोणतीही पुष्ठी करत नाही.  या ओडिओ क्लिपमध्ये एका मुलानं वाल्मिक कराड याला फोन केला, तो वाल्मिक कराडला म्हणतोय अण्णा मला पुन्हा पोलीस फोन करून त्रास द्यायला लागले आहेत. त्यावर वाल्मिक कराड याने त्या मुलाकडून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचा फोन नंबर घेतला. त्यानंतर त्याने फोन केला. किरकोळ गुन्हा आहे, पोरगा सोडून द्या, असं तो या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटला आहे.  त्यानंतर पुढे बोलण झाल्यानंतर त्याने असं देखील म्हटलं आहे की   मी बीड जिल्हाचा बाप आहे, चिंता  नको. या ऑडिओ क्लिपमुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे सोमवारी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी असा दावा केला की, मी अजित पवार यांच्याकडे काही कागदपत्रं सादर केली आहेत, बीडच्या कंपन्यांचे बॅलेन्स शीट सादर केले. त्यावर मुंडे पती -पत्नीच्या सह्या आहेत. यातून आपण अजित पवार यांना दाखवलं की कशापद्धतीनं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध होतं. तसेच दमानिया यांनी अजित पवारांकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.