बीडमध्ये तिरंगी लढत होणार, कोण गाठणार दिल्ली?

| Updated on: Apr 05, 2024 | 9:59 PM

बीड मतदारसंघातून यंदा प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. आणखी एक तिसरं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कोण आहे तो उमेदवार जाणून घ्या.

बीडमध्ये तिरंगी लढत होणार, कोण गाठणार दिल्ली?
Beed loksabha election
Follow us on

Beed Loksabha : बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पंकजा मुडे यांच्यासमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचं आव्हान असणार आहे. मात्र, या मतदारसंघातून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बीडमध्ये शरद पवार गटानं उमेदवार जाहीर केल्यानंतर बीडची लढाई निश्चित झालीये. भाजपच्या पंकजा मुंडेंसमोर शरद पवार गटाचे बजरंग सोनवणेंचं आव्हान असणार आहे. बीडमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणेंनी थेट मुंडे भगिनींवर टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान बजरंग सोनवणेंच्या टीकेला पंकजा मुंडेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय.

प्रचाराचा नारळ फुटला

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बजरंग सोनवणेंनी प्रचाराचा नारळ फोडला. दरम्यान यानंतर पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंना मिश्किल टोला लगावात शुभेच्छा दिल्यात. 2019 मध्ये पंकजा मुंडेंच्या भगिनी प्रीतम मुंडेंनी बीडमधून निवडणूक लढवली होती. मात्र, यावर्षी प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

2019 बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडेंसमोर राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंचं आव्हान होतं. 2019 मध्ये प्रीतम मुंडेंना 6 लाख 75 हजार 841 मतं मिळाली होती. तर बजरंग सोनवणेंना 5 लाख 9 हजार 108 मतं मिळाली होती. 1 लाख 66 हजार 733 मतांच्या फरकानं प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या.

बीड मतदारसंघात एकूण ६ मतदारसंघ

बीड, परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई आणि केज हे विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभेत येतात. बीडमध्ये शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आमदार आहेत. बीड मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. परळीत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे आमदार आहेत. त्यांचाही आपल्या मतदारांवर होल्ड आहे. माजलगावमध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आमदार आहेत. आष्टीमध्ये अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार आहेत. तर गेवराईत भाजपचे भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत. केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा हे आमदार आहेत. यावरून महायुतीची बीड लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असल्याचं स्पष्ट होतंय.

ज्योती मेटे आव्हान देण्याची शक्यता

बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंना ज्योती मेटे देखील आव्हान देण्याची शक्यता आहे. कारण ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तसंच मेटेंना वंचितकडूनही ऑफर देण्यात आल्याची देखील चर्चा आहे.

कोण आहेत ज्योती मेटे

शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांच्या त्या पत्नी आहेत. ज्योती मेटे शिवसंग्राम पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे.

बीडमधून पंकजा मुंडेंसमोर बजरंग सोनवणेंचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे ज्योती मेटे बीडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास लढत तिरंगी होणार आहे. त्यामुळे कोणाला पराभवाचा धक्का बसणार आणि कोण दिल्ली गाठणार हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे.